टीम अण्णांच्या सदस्य असणाऱ्या किरण बेदींनी वेगवेगळ्या संस्थांकडून 'बिझनेस क्लास' चे पैसे घेऊन विमानप्रवास मात्र 'इकॉनॉमी क्लास' ने करून वाचवलेले पैसे सामाजिक कार्यासाठी वापरले असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. या प्रकरणावर किरण बेदींनी आता नवा पवित्रा घेतला आहे. ज्यांचे पैसे घेतले त्या संस्थांना मी लवकरच चेकद्वारे पैसे परत करणार आहे, असे बेदी यांनी ट्विटरवर ट्विट केले आहे.
शौर्यपदकविजेत्यांसाठी असलेल्या सुविधांचा वापर करून बेदी एअर इंडियाच्या तिकिटावर ७५ टक्के सवलत मिळवतात मात्र , कार्यक्रमाच्या आयोजकांकडून तिकिटाचे पूर्ण पैसे वसूल करतात, असे वृत्त अलिकडेच प्रसिद्ध झाले होते.
त्यावर खुलासा करताना , ' मी स्वत : च्या फायद्यासाठी काहीही करत नाही . आयोजक मला बिझनेस क्लासचे तिकीट देतात . इकॉनॉमी क्लासने प्रवास करणे हा माझा निर्णय असतो . त्यातून वाचलेले पैसे इंडिया व्हिजन फाऊंडेशन या माझ्या एनजीओकडे जातात . आयोजकांना त्याची कल्पना देण्यात येते आणि अनेकदा एनजीओसाठी पैसे वाचवल्याबद्दल त्यांनी माझे कौतुकही केले आहे ,' असे किरण बेदी म्हणाल्या होत्या . निमंत्रण संस्थेला असते . चेक फाऊंडेशनच्या नावे येतो आणि शिल्लक रक्कमदेखील संस्थेतच जमा होते , असेही त्यांनी सांगितले होते .