www.24taas.com, गुवाहाटी
आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये सगळ्या संवेदनशील समाजालाच लाजवेल असा प्रकार घडलाय. एका महाविद्यालयीन तरुणीशी वर्दळीच्या ठिकाणी छेडछाड आणि मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ यूट्यूबवरवरून लोकांच्या समोर आल्यावर या घटनेला वाचा फुटलीय.
सूत्रांच्या माहितीनुसार, १० जुलै रोजी पीडित तरुणी आपल्या मित्रासोबत गुवाहाटी-शिलाँग रोडवरच्या एका बारमध्ये गेली होती. यावेळी तीचं मित्रमैत्रिणींसोबत काही कारणामुळे भांडण झालं. याचाच फायदा घेऊन एका घोळक्यानं या मुलीला गाठलं. यामध्ये २० हून अधिक जण सामील होते. त्यांनी फक्त छेड काढलीच पण यावेळी तिचे कपडेही भर रस्त्यात फाडण्यात आले. तसंच तिला मारहाणही करण्यात आली. ही मुलगी ११वीत शिकत असल्याचं समजतंय. घोळका तिच्याशी असभ्य वर्तन करत असताना ती ओरडत होती, हाका मारत होती पण कुणीही तिला मदत केली नाही. आजुबाजुला जमलेल्या लोक तिचा तमाशा बघत उभी राहिली.
आसामच्या डीजीपींच्या म्हणण्यानुसार या घृणास्पद घटनेत सहभागी असलेल्यांपैकी ११ आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलंय. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी चार जणांना अटक केलीय तर बाकीचे मात्र फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आसाम इलेक्ट्रॉनिक डेव्हलमेंट कॉर्पोरेशनचा एका कर्मचाऱ्याही समावेश आहे. त्याचं नाव ज्योति कलिता असल्याचं समजतंय. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेची निंदा केलीय. मुलीच्या आईनं दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल केलेत.