भाजपनं सरकारला केलं 'टार्गेट'

सरकारनं जनतेला लोकपाल बिलापासून वंचित ठेवलं आहे. त्यामुळं नैतिकतेच्या आधारे सरकारनं राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपनं केली आहे. भाजप नेते अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर तोफ डागली. सरकारनं घाबरुन मतदानापासून पळ काढल्याची टीका त्यांनी केली.

Updated: Dec 30, 2011, 07:51 PM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

सरकारनं जनतेला लोकपाल बिलापासून वंचित ठेवलं आहे. त्यामुळं नैतिकतेच्या आधारे सरकारनं राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपनं केली आहे. भाजप नेते अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर तोफ डागली. सरकारनं घाबरुन मतदानापासून पळ काढल्याची टीका त्यांनी केली. कालचा दिवस लोकशाहीसाठी काळा दिवस होता अशा शब्दांत त्यांनी सरकारला टार्गेट केलं आहे.

 

राज्यसभेत झालेल्या लोकपाल बिलाच्या खेळखंडोब्याला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. आलेल्या सर्व सुधारणांचा विचार करून आगामी बजेट अधिवेशनात पुन्हा लोकपाल बिल मांडणार असल्याची सांगत काँग्रेसनं सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. बिल मंजूर होऊ नये म्हणून विरोधकांनी मुद्दामून जास्तीत जास्त सुधारणा दिल्या असा आरोपही संसदीय कामकाज मंत्री पवनकुमार बन्सल यांनी केला आहे.

 

लोकपाल बिलावरुन राज्यसभेत काल घडलेल्या प्रकारानंतर यूपीए सरकारनं नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली आहे. राज्यसभेत लोकपाल बिलावरुन झालेल्या नाट्यमय घडामोडीबाबत गडकरींनी सरकारवर तोंडसुख घेतलं. सशक्त लोकपाल यावं अशी सरकारची इच्छा नसल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे. काल काँग्रेस आणि यूपीए सरकारनं भारतीय लोकशाहीची थट्टा केल्याची टीकाही त्यांनी केली. त्यामुळं या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.