www.24taas.com, कोलकाता
राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आघाडीवर नाव असलेल्या प्रणव मुखर्जींना त्यांच्या राज्यातूनच मोठा विरोध होतोय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुखर्जींच्या ऐवजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांना पसंती दिली आहे.
एका मुलाखतीत बॅनर्जी यांना राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यात त्यांना मीरा कुमार, माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम, महात्मा गांधींचे नातू गोपाळ गांधी यांच्यापैकी कुणाला पाठिंबा द्याल असा प्रश्न करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी मितभाषी असलेल्या मीरा कुमार यांना पाठिंबा देऊ असं स्पष्ट केलं. प्रणव मुखर्जी यांना उमेदवारी देणं हा काँग्रेसचा प्रश्न आहे. मात्र माझ्या पक्षाची भूमिका ही वेगळी असल्याचंही त्यांनी ठासून सांगितलं.
ममता दीदींच्या या उत्तरामुळे पुन्हा राष्ट्रपतीपदावरून वाद पेटण्याची शक्यता दिसत आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जसजशी जवळ येत जाईल तसतसे त्यात वेगवेगळे राजकीय संदर्भ येऊन ती रंगतदार होत जाण्याची चिन्हं दिसत आहेत. ममता दीदींनी काँग्रेसच्या डिनरला येण्यासही नकार दिला आहे.