केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या ‘ लेटर बॉम्ब ’ नंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमधील कुरबुरी जगजाहीर झाल्या असतानाच, भाजपच्या दोन बड्या नेत्यांमध्येही चांगलीच तणातणी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. हे दोन नेते म्हणजे, लालकृष्ण अडवाणी आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी. या दोघांमधील दरी दिवसेंदिवस इतकी वाढतेय की, उद्यापासून सुरू होणा-या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीपासून दोन हात लांबच राहायचं मोदींनी ठरवलंय.
तसं पाहिलं तर, नरेंद्र मोदींच्या ‘ सद्भावना अभियाना ’ वेळी लालकृष्ण अडवाणींची उपस्थिती, पंतप्रधानपदासाठी त्यांनी मोदींच्या नावाची केलेली शिफारस आणि गुजरातच्या विकासाची त्यांनी भरभरून केलेली स्तुती, हे सगळं चित्र भाजपमधल्या एकीचं, मतैक्याचं, मनोमीलनाचं दर्शन घडवणारं आहे. पण ‘ अंदर की बात ’ काही औरच आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे हे दोन आजी-माजी चेहरे सध्या एकमेकांपासून चेहरा लपवण्याचा प्रयत्न करू लागलेत.
त्याचं झालं असं की, लालकृष्ण अडवाणींनी भ्रष्टाचाराविरोधात रथयात्रेची घोषणा केली आणि तिथेच या वादाची ठिणगी पडली. तोपर्यंत सारं आलबेल होतं. या यात्रेची सुरुवातही गुजरातेतूनच होणार होती. पण, या यात्रेचा गाजावाजा सुरू झाला असतानाच, मोदींनी तीन दिवसांचं उपोषण जाहीर केलं आणि रथयात्रेचा विषय मागे पडला. हे अडवाणींच्या मनाला लागलं असावं. हे कमी म्हणून की काय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंही रथयात्रेला पाठिंबा देण्यासाठी त्यांना खुपणारी अट घातली. त्यांच्याकडून पंतप्रधानपदावरील दावा सोडल्याची घोषणा करवून घेतली.
रा. स्व. संघाच्या या पवित्र्यामागे मोदी गटाचा हात असल्याचा अडवाणी गटाला संशय आहे. म्हणूनच की काय, अडवाणींनी रथयात्रेचा शुभारंभ बिहारमधून करण्याचा निर्णय घेतला. तसंच, या यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्याची जबाबदारी त्यांनी मोदींचे विरोधक नितीश कुमार यांच्याकडे सोपवली. त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठीच मोदींनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. या बैठकीला न जाणारे ते पक्षाचे एकमेव वरिष्ठ नेते आहेत.
दरम्यान, नरेंद्र मोदींनी या अनुपस्थितीचं कारण नवरात्र हे दिलंय. नऊ दिवस आपला उपवास असल्यानं आपण फारसं घराबाहेर पडत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु, त्यावर कितपत विश्वास ठेवायचा, हे समजूतदारांना वेगळं सांगायची गरज नाही.