शिवसेनेला ठाण्यात धक्का!

ठाण्यात फुटाफुटीचे आणि फोडाफोडीच्या राजकारणाने जोर धरला आहे. गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीमधून शिवसेनेत जाणाऱ्यांचा सिलसिला सुरू होता. मात्र, आज राष्ट्रवादीने शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती गणेश साळवी यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे

Updated: Jan 10, 2012, 05:13 PM IST

www.24taas.com, ठाणे

ठाण्यात फुटाफुटीचे आणि फोडाफोडीच्या राजकारणाने जोर धरला आहे. गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीमधून शिवसेनेत जाणाऱ्यांचा सिलसिला सुरू होता. मात्र, आज राष्ट्रवादीने शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती गणेश साळवी यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

 

गणेश साळवी राष्ट्रवादीत गेल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी ठाण्यामध्ये शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांसह अनेक नगरसेवक फोडले होते. शिवसेनेच्या वारनंतर राष्ट्रवादीने हा पलटवार केला आहे.  काल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुभाष भोईर यांनी पक्षाला रामराम ठोकण्याची घोषणा केली होती. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याचं त्यांनी झी चोवीस तासशी बोलताना सांगितले.

 

 

आपला पक्ष सोडण्याचा निर्णय पक्का झाला असल्याचं त्यांनी म्हटलंय. ही बाब आपण पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातली असून पक्षाला सोडचिठ्ठी कधी देणार, याची तारीख नक्की व्हायची बाकी असल्याचं त्यांनी म्हटले आहे. भोईर शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळं महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

 

 

त्यापूर्वी ठाण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक उमेश पाटील, उपाध्यक्ष दशरथ पाटील या पितापुत्रांसह माजी नगरसेविका सुरेखा पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मनमानी कारभार आणि पक्षातील अंतर्गत राजकारणावर नाराज होऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगण्यात आले होते.

पक्षात योग्य स्थान मिळत नसल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना हा मोठा हादरा असल्याचं बोललं जातं आहे.

निवडणुकीआधी अनेक राजकिय इच्छाशक्ती असणारे बंडखोर अनेक पक्षातून बंडखोरी करून येत असतात त्यामुळे आता यापुढे जसं जस निवडणुकीचा रंग चढू लागेल तसतसे अनेक बंडखोर बंडखोरी करण्याची शक्यता आहे.