माणिकरावांचं सूडाचं राजकारण?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी श्रावण हर्डीकर यांची बदली सूड बुद्धीनं करवून घेतल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी केलाय. माणिकरावांनी सुडाचं राजकारण केल्याचं राठोड यांचं म्हणणं आहे.

Updated: Jun 5, 2012, 10:28 AM IST

www.24taas.com, यवतमाळ

 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी श्रावण हर्डीकर यांची बदली सूड बुद्धीनं करवून घेतल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी केलाय. जिल्हा परिषद निवडणुकीत माणिकराव आणि पालकमंत्री नितीन राऊत यांच्यावर आचारसंहितेचा गुन्हा दाखल झाल्यामुळेच माणिकरावांनी सुडाचं राजकारण केल्याचं राठोड यांचं म्हणणं आहे.

 

यवतमाळचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्रावण हर्डीकर यांची एका वर्षातच अनपेक्षितरित्या बदली झाल्यानं जिल्ह्यात संतापाची लाट उसळलीय. जिल्हा परिषद निवडणूकीच्या काळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पालकमंत्री नितीन राऊत आणि माणिकरावांचे पुत्र राहुल ठाकरे यांच्या विरोधात आचरसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळेच हा राग मनात धरून माणिकरावांनी जिल्हाधिका-यांवर सुड उगविल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी केलाय.

 

कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी म्हणून हर्डीकर यांनी अत्यंत कमी काळात आपला दबदबा निर्माण केला. त्यांच्या बदलीमुळे जनतेतून नाराजीचा सूर उमटलाय. माणिकरावांनी वैयक्तिक आकसापोटी त्यांची केलेली बदली जिल्ह्याच्या विकासाला मारक ठरू शकते अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. जिल्ह्याधिका-यांच्या बदलीबाबत काँग्रेस आमदारांमध्येही नाराजी आहे. बदली रद्द करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. त्यामुळे आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष याबाबत काय भूमिका घेतात याकडेच सा-यांचं लक्ष लागलय.