www.24taas.com, नागपूर
गेल्या काही दिवसांत झालेल्या वाघांच्या शिकारीची गंभीर दखल वनविभागनं घेतली आहे. वाघांना वाचवण्यासाठी खास पथक तयार करण्याचा निर्णय वनविभागनं घेतला आहे. गेल्या काही दिवसांत वाघांच्या झालेल्या मृत्यूवरुन वनविभाग टीकेचं लक्ष बनला आहे.
वाघांचा मृत्यू झाल्यानंतर तेवढ्यापुरती काही तरी थातुरमातुर कारवाई केली जाते असा आरोपही वनविभागावर सातत्यानं होतो. त्यात बरच तथ्यही आहे. मात्र आता वनविभागनं वाघांच्या सुरक्षेसाठी विशेष पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या पथकामध्ये २२४ सदस्य असणार आहेत. जंगलात ज्या ठिकाणी पाणी आहे. त्या ठिकाणी वाघांची शिकार होण्याची जास्त शक्यता असते. अशा ठिकाणांवर या पथकाचा वॉच असणार आहे. वाघांच्या वाढत्या शिकारीला हे पथक कशाप्रकारे पायबंद घालतं ते पहावं लागेल.