www.24taas.com, धुळे
धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यात भीषण दुष्काळ पडलाय. सरकारी अधिका-यांनी मात्र दुष्काळ नसल्याचा अहवाल दिलाय. त्यामुळं अनेक गावं सरकारी मदतीपासून वंचित आहेत. गावक-यांवर क्षारयुक्त पाणी पिऊन दिवस काढण्याची वेळ आली आहे.
कायम आवर्षणप्रवण क्षेत्रात मोडणा-या शिंदखेडा तालुक्यातल्या गावांवर अन्याय झालाय. तालुक्यातल्या सर्वच गावांची आणेवारी पन्नास पैशापैक्षा जास्त दाखवण्यात आली आहे. प्रत्यक्षात बहुतांश गावातल्या शेतक-यांनी खरीप आणि रब्बी पिकं गमावली आहेत. पाणी टंचाईही आधीपासून सुरु आहे.साधं शुद्ध पाणी मिळणंही कठीण झालं आहे. गावकरी क्षारयुक्त पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करत आहेत.
टंचाई आणि दुष्काळात होरपळणारे हजारो शेतकरी सरकारी मदतीक़डे डोळे लावून आहेत. अनेक मंत्री आले, पाहणी समित्या आल्या आणि गेल्याही... पण, मदत मात्र आली नाही. आता मुख्यमंत्री येतील तेव्हा ते निश्चित मदत देतील अशी भाबडी आशा बाळगून दिवसांवर दिवस ढकलत आहेत.