मनसे युतीला मदत करणार?

नाशिक विधान परिषद निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापायला लागलंय. सर्वच पक्षांचे मतदार अज्ञातस्थळी रवाना झालेत.

Updated: May 23, 2012, 02:49 PM IST

www.24taas.com, नाशिक

 

नाशिक विधान परिषद निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापायला लागलंय. सर्वच पक्षांचे मतदार अज्ञातस्थळी रवाना झालेत. महापालिकेच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले भाजप शिवेसना आता विधान परिषद निवडणुकीसाठी एकत्र आलेत. महापौरांच्या घरी  मनसेच्या नगरसेवकांची बैठक झाली. यावरुन स्थायी निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी मनसेही युतीच्या उमेदवाराला मदत करण्याची शक्यता आहे.

 

विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी महापौरांच्या निवासस्थानी मनसेच्या सर्व नगरसेवकांची बैठक झाली. या निवडणुकीत युतीला सोबत घ्यायचं की नाही यावर यावेळी चर्चा झाली. या बैठकीचा अहवालही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आलाय. आता मनसेचे नगरसेवक वाट बघतायत ती राज ठाकरेंच्या आदेशाची...

 

पण, मनसेची भूमिका ही शिवसेना-भाजपला पाठिंबा देणारीच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय. काल रात्री भाजपच्या कार्यालयात युतीच्या नेत्यांचीही बैठक झाली. पुढची रणनिती यावेळी निश्चित करण्यात आलीय.  शिवसेनेचे सर्व नगरसेवक काल तर भाजपचे नगरसेवक आज अज्ञातस्थळी रवाना झालेत. तर मनसेचेही नगरसेवक कुठे गेलेत याचा अजून थांगपत्ता लागलेला नाही.