www.24taas.com, खंडाळा
मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर कामशेत बोगद्याजवळ झालेल्या विचित्र अपघातात तब्बल ४० वाहने एकावर एक आदळली. या अपघातात १० जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातामुळे एक्स्प्रेस वेवर वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली आहे.
अपघातग्रस्त वाहने पुण्याच्या दिशेने जात होती. पहिल्याच पावसामुळे बोगद्यात पाणी साचल्याने आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर पाऊस पडत असल्याने रस्ता निसरडा झाला. त्यामुळे कामशेत बोगद्याजवळच्या वळणारी वाहने घसरत जाऊन एकमेकांवर आदळली. त्यामुळे गोंधळ उडाला. मुंबईला जाणाऱ्या गाड्यांचा खोळंबा झाला.तर वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे जुन्या मार्गावरून वाहतूक वळविण्यात येत आहे.
अपघातग्रस्त वाहने बोगद्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे. कामशेत बोगद्यातील एक लेन सुरू झाल्याने वाहतूक धिम्या गतीने सुरू झाली आहे. दरम्यान, वाहनांच्या तीन ते चार किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. त्यातच पावसाच्या सरी कोसळत असल्याने वाहतुकीत अडथळा येत आहे.