IND VS AUS दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचं पुनरागमन? Video आला समोर

IND VS AUS 2d Test : पहिल्या टेस्ट सामन्यापूर्वी दुखापत झाल्याने पर्थ टेस्टला मुकलेला स्टार खेळाडू आता दुसऱ्या टेस्टमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. 

पुजा पवार | Updated: Nov 29, 2024, 05:06 PM IST
IND VS AUS दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचं पुनरागमन? Video आला समोर   title=
(Photo Credit : Social Media)

IND VS AUS 2d Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात सध्या 5 सामन्यांची टेस्ट सीरिज बॉर्डर गावकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) खेळवली जात असून यातील दुसरा सामना हा 6 डिसेंबर पासून सुरु होणार आहे. पर्थमध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर दमदार विजय मिळवला आणि सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यासाठी सुद्धा कसून सरावाला सुरुवात केलेली आहे. सध्या याचे व्हिडीओ सुद्धा समोर येत आहेत.  पहिल्या टेस्ट सामन्यापूर्वी दुखापत झाल्याने पर्थ टेस्टला मुकलेला स्टार खेळाडू आता दुसऱ्या टेस्टमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. 

पर्थ टेस्ट सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियातील WACA मैदानावर भारत आणि भारत-A यांच्यात तीन दिवसीय वार्मअप सामना खेळवण्यात आला होता. वॉर्म अप सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा स्टार खेळाडू शुभमन गिलला कॅच पकडताना अंगठ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला पहिल्या सामन्याला मुकावे लागले. त्यावेळी आलेल्या रिपोर्ट्सनुसार शुभमन गिल हा सुरुवातीच्या दोन टेस्ट सामन्याला मुकणार असल्याचे बोलले जात होते. मात्र दुसऱ्या टेस्टला अजून 5 ते 6 दिवस शिल्लक असताना शुभमनने (Shubhman Gill) फलंदाजीचा सराव करायला सुरुवात केली आहे.  

शुभमन गिलच्या सरावाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो दुसऱ्या टेस्ट सामन्यात खेळताना दिसू शकतो असं बोललं जात आहे. पर्थ टेस्ट सामना टीम इंडियाने जिंकला, मात्र पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाची फलंदाजी गडगडली होती. त्यामुळे टीम इंडियाला केवळ 150 धावांचा टप्पा गाठता आला होता. दुसऱ्या टेस्टमध्ये शुभमन गिलचे पुनरागमन झाले तर तो पहिल्या फळीमध्ये फलंदाजी करताना दिसू शकतो. 

बॉर्डर गावस्‍कर ट्रॉफीचं वेळापत्रक : 

पहिली  टेस्‍ट: 22 ते  26 नोव्हेंबर 
दुसरी टेस्‍ट: 6 ते 10 डिसेंबर 
तिसरी टेस्‍ट: 14 ते 18 डिसेंबर 
चौथी टेस्‍ट: 26 ते 30 डिसेंबर 
पाचवी टेस्‍ट: 3 ते 7 जानेवारी