शिवसेनाही पिंपरीतील अतिक्रमणाच्या विरोधात

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आक्रमक भूमिका घेत आहेत, हे लक्षात आल्यानंतर आता शिवसेनेनही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे.

Updated: Aug 8, 2012, 07:18 AM IST

कैलास पुरी, www.24taas.com, पिंपरी-चिंचवड

 

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आक्रमक भूमिका घेत आहेत, हे लक्षात आल्यानंतर आता शिवसेनेनही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. कारवाई थांबवण्याची मागणी करत शिवसेनेने येत्या १६ तारखेला मोठं आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांच्या दरम्यान सुरु असलेल्या सत्ता संघर्षामुळे पिंपरी चिंचवडला बेघर होण्याची वेळ आल्याचा टोलाही शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी लागावलाय.

 

अजित पवार यांच्या आदेशाला डावलत पिंपरी चिंचवड मधल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी अतिक्रमण विरोधी कारवाई विरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली. त्यामुळ जनतेत त्यांची प्रतिमा उजळून निघेल हे स्पष्ट होताच शिवसेनेनही अतिक्रमण विरोधी कारवाई थांबवण्याची मागणी करत आक्रमक भूमिका घ्यायचा निर्णय घेतलाय. त्याचमुळे शिवसेनेने अतिक्रमण विरोधी कारवाई थांबवण्यासाठी येत्या १६ तारखेला आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे आणि पिंपरीताल्या स्थानिक नेत्यांनी आज पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रीकर परदेसी यांची भेट घेत कारवाई थांबवण्याची मागणी केली...

 

अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पडून आहे. केवळ अजित पवार आणि मुख्यमंत्र्याच्या सत्ता संघर्षामुळ पिंपरीतल्या जनतेवर बेघर व्हायची वेळ आल्याचा आरोपही त्यांनी केलाय. पिंपरी चिंचवड मध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई होणार हे स्पष्ट असल्यामुळे जनता हवालदिल झाली आहे. त्यातच जनतेपुढे जायचं कसं या भीतीने राष्ट्रवादीच्या आमदारांनी न्यायालयीन लढाईचा निर्णय घेतलाय. त्यामुळे शिव सेनेने आपणही जनतेबरोबर आहोत हे दाखवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. यातून सर्वसामान्याना काही तरी दिलासा मिळावा एवढीच अपेक्षा...