www.24taas.com, बीड
बीडमधील संशयित गर्भपात प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झालाय. या रिपोर्टमुळे सदर गर्भ मुलीचाच असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे ‘स्त्री भ्रृण हत्येच्या’ संशयाला आता पुराव्याचं बळ मिळालंय.
नुकतीच, डॉ. सुदान मुंडे यांच्या हॉस्पिटलमध्ये गर्भपात करत असतानाच विजयमाला व्हटेकर या महिलेचा मृत्यू झाला होता. धारुर तालुक्यातल्या भोपा गावात ही महिला राहत होती. या महिलेल्या चार मुली असल्याने ती गर्भपात करुन घेण्यासाठी सुदाम मुंडेच्या हॉस्पिटलमध्ये आली होती. 17 आठवड्यांचा हा गर्भ काढून टाकण्याच्या डॉक्टरांच्या प्रयोगात अतिरक्तस्त्राव झाल्यानं संबंधित महिलेचा मृत्यू झाला.
डॉ. मुंडे यांच्याविरुद्ध याप्रकरणात गुन्हाही दाखल झालाय. मात्र यापूर्वीही गर्भपातांच्या प्रकरणांमुळ मुंडे यांच्या दवाखान्याला सील ठोकण्यात आलं होतं. मात्र कायद्याच्या पळवाटा शोधून ते सहीसलामत सुटले. एवढंच नव्हे तर त्यांची मजल सुरूत राहिली. त्यामुळं पोलिसांच्या भूमिकेविषयी देखील आता संशय व्यक्त करण्यात येत आहे. मागच्या वर्षी ‘लेक लाडकी’ या अभियानाच्या माध्यमातून सुदाम मुंडे यांच्या हॉस्पिटलचं स्टिंग ऑपरेशन करण्यात आले होतं. त्यावेळी त्यांची चोरी उघड झाली होती.