www.24taas.com, बंगळुरू
टीम इंडियाची अभेद्य भिंत मानल्या जाणाऱ्या राहुल द्रविडने आज सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. निवृत्ती घेताना अर्थातच दुःख होत असले, तरी नव्या दमाच्या युवा खेळाडूंना संधी मिळावी यासाठी निवृत्ती घेतल्याचे राहुल द्रविडने म्हटले आहे. बंगळुरू येथील पत्रकार परिषदेत राहुल द्रविडने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. या प्रसंगी द्रविडबरोबर बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन आणि माजी क्रिकेटर अनिल कुंबळे हे ही उपस्थित होते. आपली निवृत्ती जाहीर करताना द्रविडने आपल्या चाहत्यांचे आभार मानले. याचबरोबर आपले कोच, फिजिओथेरपिस्ट यांचेही त्याने आभार मानले. आपल्या टीम इंडियाला आपण मिस करू, असंही द्रविड यावेळी म्हणाला.
"आपल्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल आपण समाधानी असून गेल्या १६ वर्षांत क्रिकेटचा मनसोक्त आनंद लुटल्याची प्रतिक्रियाही त्याने दिली. उत्कृष्ट क्रिकेटर होण्यासाठी मी सदैव प्रयत्न केले. टीकांमधूनही मी शिकण्याचा प्रयत्न केला." निवृत्तीबाबत सचिन तेंडुलकरशी चर्चा केली असल्याची माहितीही द्रविडने दिली.
द्रविड हा एक महान क्रिकेटर असल्याचं मत यावेळी श्रीनिवासन यांनी व्यक्त केलं, तर आजच्या तरूणांसाठी राहुल द्रविड प्रेरणास्थान आहे अशी भावना अनिल कुंबळेने व्यक्त केली.
राहुलने गेल्या १५ वर्षापासून आपल्या तंत्रशुद्ध बॅटिंगनं सर्वांनाच मंत्रमुग्ध केलंय. १९९६ मध्ये राहुल द्रविडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश झाला. टेस्टमधील या तंत्रशुद्ध बॅट्समननं वनडेमध्येही थोड्या कालावधीत आपल्य़ा भोवती एक वेगळ वलय निर्माण केलं. राहुलनं सिंगापूरमध्ये भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील ट्रँग्युलर सीरिजमधून वन-डेत पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच वनडे मॅचमध्ये त्याला अपेक्षित यश मिळालं नाही. मात्र पहिल्याच टेस्टमध्ये त्यानं इंग्लंडविरुद्ध लॉर्डसवर शानदार ९५ धावांची खेळी केली. त्यानंतर राहुलनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. गेली पंधरा वर्षं तो अवरित भारतीय क्रिकेटची सेवा करत आहे.राहुलनं आपल्या तंत्रशुद्ध आणि क्लासिक बॅटिंगनं सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं. राहुल द्रविड टीम इंडियाच्या बॅटिंगचा प्रमुख आधारस्तंभ ठरला.
राहुलने आत्तापर्यंत १६४ टेस्टमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. १३ हजार २८८ रन्स त्याच्या बॅट्समनधून आले आहेत. द्रविडने ३६आंतरराष्ट्रीय टेस्ट सेंच्युरी झळकावल्या आहेत. त्याने ५२.३१ च्या सरासरीने रन्स काढल्या आहेत.
राहुलनं आपल्या जिगरबाज बॅटिंगनं नेहमीच भारताच्या इनिंगला आकार दिला आणि अनेक अविस्मरणीय इनिंगही खेळल्या.टीमसाठी केवळ बॅटिंगचं नव्हे तर विकेट किपिंगची जबाबदारी त्यानं अंगवार घेतली आणि यशस्वी पार पाडली.त्यामुळेच क्रिकेटसाठी नेहमी समर्पित राहिलेल्या द्रविडची उणीव भऱून काढणे टीम इंडियासाठी अवघड असणार आहे.
[jwplayer mediaid="62498"]