www.24taas.com,नवी दिल्ली
हैदराबाद दोन बॉम्बस्फोटानंतर गुरवारी हादरलं. त्यानंतर आज पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी हैद्राबादमध्ये जाणार आहेत.
हैदराबाद स्फोटांना दोन दिवस उलटून गेले असताना आंध्र प्रदेश सरकारनं अत्यंत महत्वाचे धागेदोरे हाती लागल्याचं म्हटलंय. तपासासाठी १५ टीम्स तयार करण्यात आल्याचं आंध्रच्या गृहमंत्र्यांनी सांगितलंय. आज सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग भेट देत असल्याने ते काय घोषणा करतायेत याकडे लक्ष लागले आहे.
स्फोटांच्या मोडस ऑपरेंडीवरून संशयाची सुई इंडियन मुजाहिद्दीनकडेच जातेय आणि त्या दिशेनं तपास सुरू आहे. अब्दुल वासी मिर्झा हा २३ वर्षांचा युवक शहरातल्या दोन स्फोटांत जखमी झालाय. त्याचीही पोलिसांनी चौकशी केली.
दरम्यान, तपासासाठी महत्वाची माहिती देणा-यास १० लाख रुपयांचं बक्षीस हैदराबाद पोलिसांनी जाहीर केलंय. तर कोणत्याही बॉम्बस्फोटानंतर स्फोटातील जखमी आणि मृतांना सरकारकडून मदतीची घोषणा होते. मात्र प्रत्यक्षात ही मदत सर्वांना मिळतेच असं नाही. हैदराबादमध्ये २००७ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात डोळा गमावलेले एक दुर्दैवी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहे.