www.24taas.com,औरंगाबाद
दुष्काळाच्या झळा सोसणा-या मराठवाड्यात आता लोकांना लग्नासारखी गोष्ट सुद्धा आटोपशीर घ्यावी लागते.पिकांचे नुकसान झाल्याने लोकांकडे पैसाच नाही अशा परिस्थितीत लग्न करावे तरी कसे, असा प्रश्न लोकांना पडलाय. त्या दोघांचं फेसबुकवर जमलं आणि लग्नाचा बार उडवला २०० रूपयांत.
फेसबुकवरील लग्नाची गोष्ट. अजित आणि रिनाची तशी ओळख झाली ती सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर. रिना मुंबईची तर अजित औरंगाबदचा. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र,त्यांच्या लग्नात आडवा आला तो दुष्काळ. सिल्लोड तालुक्यातील उंडणगावचे रहिवासी असलेले जगन पाटील यांनी या प्रश्नावर तोडगा काढला. दुष्काळी परिस्थितीत थाटामाटात लग्न नको म्हणत त्यांनी आपल्या मुलाचे लग्न अवघे २०० रुपयांत पार पाडलं.
नवरदेवाला जुनेच कपडे, नवरीची साडीही जुनीच, आंतरपाटासाठी घरातलाच रुमाल, गळ्यात घालण्यासाठी प्लास्टीकचे हार आणि चहापानाचा खर्च बस्स इतकाच काय तो लग्नाचा खर्च, आणि नवरदेव अजित पाटील आणि नवरी रीना घराटे यांनी सुद्धा आनंदात या लग्न सोहळ्याला होकार दिला.
या लग्नाची गोष्टही तशी निराळीच अजित आणि रिनाची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली मुलगी मुंबईच्या उल्हासनगरची आहे, तिथे ती खासगी नोकरी करते. त्यातून या दोघांची ओळख वाढली दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. मुलीच्या घरचे लोक अजितच्या घरच्यांसोबत बोलण्यास आले आणि तिथेच कुठल्याही खर्चाविना लग्नाचा बार उडवण्याचा निर्णय़ झाला.
अखेर दुष्काळानं घेरलेल्या या गावात अवघं २०० रुपयात हे लग्न पार पडलं आणि उंडणगावच्या या तरूणानं दुष्काळग्रस्तांसाठी एक नवा आदर्श निर्माण केला. आजकाल अनेक श्रीमंतांची लग्न मोठ्या थाटात आणि राजेशाही पद्धतीने होतात. तर काही जण विमानात तर काही जणांनी पाण्यात लग्न लावली आहेत. मात्र, दुष्काळाचे वास्तव स्वीकारून साधाच कपड्यावर केलंले लग्न राज्यासाठी आदर्श ठरलंय.