www.24taas.com, मुंबई
रेडिओ पार्सल स्फोट प्रकरणाचा उलगडा झाला असून वैयक्तिक वैमन्स्यातून हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या प्रकरणी आबा उर्फ राजभाऊ गिरी असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. यामुळे हा प्रकार कुठलाही घातपात घडविण्यासाठी करण्यात न आल्याचे उघड झाले आहे.
दुसऱ्या व्यक्तीसाठी लावलेल्या सापळ्यात ओम निंबाळकर हे वाहक अडकल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या संदर्भातील माहिती बीड पोलिसांनी एक पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या वर्षी नोव्हेंबर २०११ला आबा गिरी याचे गावातीलच गोपीनाथ तरकसे यांच्याशी वाद झाला होता. त्यानंतर आबा गिरी याच्या विरोधात अट्रोसिटीचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या वेळी दोघांमध्ये हाणामारीचाही प्रकार झाला होता. त्यामुळे तरकसे याला कुठल्यातरी प्रकरणात अडकविण्याचा डाव आबा गिरी याने रचला. जेणे करून पोलिसांचा ससेमिरा तरकसेच्या मागे लागेल. त्यासाठी त्याने एक पार्सल आणलं. त्यावर गोपीनाथ तरकसेचे नाव टाकले आणि ते बसमध्ये ठेवले. हे बेवारस पार्सल पोलिसांपर्यंत जाईल आणि त्यावर तरकसेचे नाव असल्यामुळे पोलिस तपासासाठी तरकसेकडे जातील असा गिरी याचा प्लान होता.
परंतु, या प्लाननुसार हे पार्सल घेण्यास पोलिस आले नाही. वाहक असलेल्या निंबाळकरने मोहापोटी हे पार्सल घरी नेले आणि यातील स्फोटकांचा स्फोट झाला. या स्फोटासाठी डेटोनेटरचा वापर केला गेला असा दावा पोलिस करीत आहेत. परंतु, अद्याप फॉरेन्सिकचा अहवाल आलेला नाही. त्यामुळे स्फोट कशाचा होता हे सांगणे कठीण आहे. विहिरी फोडण्यासाठी ज्या पद्धतीचे डेटोनेटर वापरले जातात, तसेच डेटोनेटर या वापरण्यात आल्याचा दावा पोलिस करीत आहेत.