पवारकाका आले पिंपरीमध्ये, पण अजितदादा आहेत कुठे?

अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात आज दस्तुरखुद्द शरद पवार यांनी कित्येक वर्षानी पाऊल ठेवलं. गेली कित्येक वर्ष पिंपरी चिंचवड शहराचा कारभार छोटे पवार पाहत आहेत. शरद पवार यांचा कार्यक्रम असताना अजित पवार यांच्या अनुपस्थितीमुळं अपेक्षेप्रमाणं बरेच प्रश्न निर्माण झाले.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 2, 2012, 08:36 PM IST

कैलास पुरी, www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात आज दस्तुरखुद्द शरद पवार यांनी कित्येक वर्षानी पाऊल ठेवलं. गेली कित्येक वर्ष पिंपरी चिंचवड शहराचा कारभार छोटे पवार पाहत आहेत. शरद पवार यांचा कार्यक्रम असताना अजित पवार यांच्या अनुपस्थितीमुळं अपेक्षेप्रमाणं बरेच प्रश्न निर्माण झाले.
कधी काळी बारामती लोकसभा मतदार संघाचा भाग असलेल्या पिंपरी-चिंचवडला शरद पवार यांचं काही वर्षापूर्वी कायम येण-जाणं असायचं. परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांनी पिंपरीला भेट देण्याचं टाळलं होतं. आज मात्र त्यांचे विश्वासू आझम पानसरे यांच्या कार्यक्रमासाठी ते आवर्जून पिंपरी-चिंचवडमध्ये हजर राहिले. साहेब हजर राहिले असले तरी शहरावर पकड ठेवणारे अजित पवारांची कार्यक्रमाला असलेली अनुपस्थिती लक्षात येणारी होती. तसंच अजितदादांचे निकटवर्तीय आमदार विलास लांडे आणि लक्ष्मण जगताप यांनी पवारसाहेबांना तोंड दाखवून कार्यक्रमातून काढता पाय घेतला. शहरातल्या शरद पवारांना मानणा-या अनेक कार्यकर्त्यांची सल आझम पानसरेंनी कार्यक्रमात बोलून दाखवली.
दोन दिवसांपूर्वी अजित पवारांच्या कार्यक्रमात पिंपरीतल्या सर्व नेत्यांनी झाडून हजेरी लावली होती. परंतु आजच्या कार्यक्रमात अजितदादांच्या अनुपस्थितीमुळं अनेकजणांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.