मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सभाच उधळली

यवतमाळमध्ये बेंबळा प्रकल्पावर आयोजित सिंचन परिषदेत सुरु असलेली मुख्यमंत्र्यांचं भाषण बंद पाडून शेतक-यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची सिंचन परिषद सभा उधळून लावली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 8, 2013, 07:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, यवतमाळ
यवतमाळमध्ये बेंबळा प्रकल्पावर आयोजित सिंचन परिषदेत सुरु असलेली मुख्यमंत्र्यांचं भाषण बंद पाडून शेतक-यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची सिंचन परिषद सभा उधळून लावली.
अतिवृष्टीने पिकांची झालेली हानी, शेतमालाला मिळत नसलेला योग्य भाव, सिंचन प्रकल्पग्रस्तांच्या समस्या असे विविध प्रश्न उपस्थित करत शेतक-यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणात गोंधळ घातला. शेतक-यांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री उत्तर देत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी नारेबाजी करत मुख्यमंत्र्यांचं भाषण बंद पाडलं.
मोठ्या संख्येने आलेल्या शेतक-यांनी आश्वासन नको, कृती करा असं सांगताच मुख्यमंत्री व्यासपिठावरून भाषण अर्धवट टाकून निघून गेले. शेतक-यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवायचा प्रयत्न केला. त्यांना काळे झेंडे दाखवले, अतिवृष्टीने सडलेले सोयाबीनही शेतक-यांनी आणले होते.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळाली नाही, सिंचन प्रकल्पातून एका एकराचही सिंचन होत नाही, शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तोडला गेला, प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन नाही असे प्रश्न एकापाठोपाठ एक शेतकरी उपस्थित करत होते, मात्र त्यावर बोलण्याचं मुख्यमंत्री टाळत असल्याने शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके यांच्या पुढाकाराने ही सिंचन परिषद आयोजित करण्यात आली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.