नांदेडमध्ये आज मतदान

नांदेड-वाघाळा महापालिकेसाठी उद्या मतदान होणार आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडमध्ये यावेळीही चित्र फारसं वेगळं असण्याची शक्यता नाही. मात्र आदर्श घोटाळ्याचा आरोप झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 13, 2012, 11:13 PM IST

केशव घोणसे-पाटील, www.24taas.com, नांदेड
नांदेड-वाघाळा महापालिकेसाठी उद्या मतदान होणार आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडमध्ये यावेळीही चित्र फारसं वेगळं असण्याची शक्यता नाही. मात्र आदर्श घोटाळ्याचा आरोप झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
नांदेड-वाघाळा महापालिका हे अशोक चव्हाण यांचं होमपिच... आदर्श घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप झाला आणि त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. सध्या राजकीय विजनवास भोगत असलेल्या चव्हाणांना पक्षात आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा आपलं वर्चस्व सिद्ध करण्याची संधी या निवडणुकीमुळे मिळणार आहे.
सध्या नांदेड महापालिकेत काँग्रेसला स्पष्ट बहुमत आहे. एकूण ७९ सदस्यांच्या महापालिकेत काँग्रेसचं संख्याबळ ४६ आहे. यात काँग्रेसचे ३९ नगरसेवक आणि अन्य समर्थक अपक्षांचा समावेश आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस १०, सेना-भाजपा युती १४ आणि लोकभारती ४ हे पक्ष आहेत. मनसेचा १ तर अपक्ष आणि अन्य पक्षांचं संख्याबळ ४ आहे...
९० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेचे गेल्या निवडणुकीवेळी ७९ वॉर्ड होते. आता आसपासची काही गावं महापालिकेत आल्यानं वॉर्डांची संख्या ८१ झालीये. एकूण ४० प्रभागांमध्ये द्विसदस्यिय निवड पद्धतीनं हे मतदान होतंय.
यंदा मतदानात ४ लाख २३ हजार ७९३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ४० प्रभागांत मिळून ५२३ मतदानकेंद्रं आहेत. सोमवारी मतमोजणी होऊन महापालिकेतल्या बलाबलाचं चित्र स्पष्ट होणार आहे.
मराठा, दलित, शिख आणि मुस्लिम मतांचा कल कोणत्या बाजूनं जातो, यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल. यात मराठा वगळता अन्य सर्व मतांचं ध्रुवीकरण काँग्रेसकडे होण्याची शक्यता आहे. याखेरीज मराठा मतदारांसह इतर पारंपारिक मतदार काँग्रेसकडेच वळण्याची शक्यता आहे.
२००८ साली झालेल्या गुरू-ता-गद्दी कार्यक्रमावेळी महापालिकेनं संपूर्ण शहराचा कायापालट केला असला, तरी पाणी पुरवठा, स्वच्छता, वाहतूक यासारख्या काही नागरी समस्या अद्याप नागरिकांना भेडसावतायत. हा मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा ठरू शकतो.
या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वाधिक लक्ष आहे, ते अशोक चव्हाण यांच्यामुळे... त्यांचं राजकीय पुनर्वसन या निकालावर अवलंबून असणार आहे. त्यांच्या पुढल्या वाटचालीच्या दृष्टीनं ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीसह शिवसेना-भाजपा त्यांची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहेत. गेल्या निवडणुकीत कपिल पाटील यांच्या लोकभारतीसोबत असलेले प्रताप पाटील-चिखलीकर राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. तसंच भाजपाचे माजी खासदार डी.बी. पाटील हे पक्षावर नाराज असून त्यांनाही गळाला लावण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न सुरू आहे. मात्र त्याच वेळी अशोक चव्हाण यांचंही राजकीय वजन नांदेडमध्ये वाढलंय. त्यांचे सहा आमदार आहेत. विधान परिषद आणि जिल्हा परिषद काँग्रेसकडेच आहे. अशा स्थितीत त्यांच्या अस्तित्वाला धक्का लागण्याची फारशी शक्यता नसल्याचंच राजकीय विश्लेषक मानतायत. त्यामुळे नांदेडमध्ये खरी स्पर्धा असणार आहे, ती क्रमांक दोनचा पक्ष कोण याची... शिवाय काँग्रेसच्या जागा वाढणार, तितक्याच राहणार की घटणार यावर अशोक चव्हाणांचं राजकीय भवितव्य पणाला लागलंय...