www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
आपल्या आईची हत्या केल्यानंतर आपल्या वडिलांनी रक्ताचे हात घरातच धुतले आणि आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, अशी साक्ष मुलाने न्यायालयात दिल्यानंतर आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.
आईवडिलांकडून नवीन घर घेण्यासाठी ५० हजार रुपये आण, असा तगादा लग्नानंतर १७ वर्षे लावूनही पत्नीने ते न आणल्याने तिची हत्या करणाऱ्याला सत्र न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कायम केली.
विशेष म्हणजे याप्रकरणी आरोपीच्या मुलाने आणि स्वतंत्र साक्षीदारांनी त्याच्याविरोधात साक्ष दिली होती.
सय्यद रझ्झाक याने पत्नी माहेरी असतानाच तिचा खून केला होता. न्यायमूर्ती के. यू. चांदीवाल आणि न्यायमूर्ती व्ही. एम. देशपांडे यांच्या खंडपीठाने रझ्झाकला हिंगोली सत्र न्यायालयाने सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले.
९ ऑगस्ट २०१० रोजी ती माहेरी गेली असता रझ्झाक आपले वडील आणि पुतण्यासोबत तिच्या घरी गेला आणि तिच्यावर चाकूने हल्ला केला़ रिझवानबीच्या आईवडिलांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला.
मात्र अन्य दोघांनी त्यांना रोखले. अखेर रुग्णालयात नेईपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
रागाच्या भरात आपल्या हातून हे कृत्य झाल्याचा दावा रझ्झाकने केला होता. पण रिझवानबीचा खून करण्याच्या पूर्वतयारीनेच तो तिच्या घरी दाखल आला होता आणि त्याने अमानुषपणे तिचा खून केला, हा घटनाक्रम सिद्ध करणारे पुरावे सरकारी पक्षाकडून सादर करण्यात आले.
एवढेच नव्हे, तर वडिलांनी रक्ताने माखलेले हात आपल्यासमोरच धुतल्याचे आणि घराबाहेर आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहिले, अशी साक्ष रझ्झाकच्या मुलाने दिली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.