`केबीसी`चा एसएमएस!... जरा संभाळून!

केबीसीच्या हॉटसीटवर बसण्याचं स्वप्नं पाहणा-या एका डॉक्टराला गंडा घालण्याचा प्रयत्न औरंगाबादमध्ये उघड झालाय. या डॉक्टरांना वेळीच संशय आल्यानं, ते फसगतीपासून बचावलेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 28, 2013, 08:36 PM IST

विशाल करोळे, www.24taas.com, औरंगाबाद
केबीसीच्या हॉटसीटवर बसण्याचं स्वप्नं पाहणा-या एका डॉक्टराला गंडा घालण्याचा प्रयत्न औरंगाबादमध्ये उघड झालाय. या डॉक्टरांना वेळीच संशय आल्यानं, ते फसगतीपासून बचावलेत.
‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभागी होऊन कोट्यवधी रुपये जिंकण्याचं अनेकांचं स्वप्न कुणाच्या मनाला भुरळ घालणार नाही. औरंगाबादचे समुपदेशन तज्ज्ञ डॉ. रवी रावलकरही त्यापैकीच एक.... गेल्या अनेक वर्षांपासून केबीसीच्या हॉटसीटवर बसण्याचं त्यांचं स्वप्न होतं. त्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र त्यांना कुठूनच प्रतिसाद मिळाला नाही. पण सात जानेवारीला त्यांच्या मोबाईलवर अचानक एक एसएमएस आला. त्यात केबीसीसाठी वाईल्ड कार्डनं एंट्री देण्यात आल्याचं लिहिलं होतं. त्यानुसार त्यांनी त्या क्रमाकांवर फोन केला. त्यावेळी पाच कोटी जिंकणारा सुशीलकुमार बोलत असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर चक्क सोनी टीव्ही आणि केबीसीचा लोगो असलेलं तीस अटींचं ऍग्रीमेंटही त्या भामट्यांनी पाठवलं. त्या ऍग्रीमेंटवर अमिताभ बच्चनची स्कॅन केलेली सहीही होती. त्यानंतर रावलकरांना साडे सहा हजार रुपये भरण्याची मागणी, त्या भामटयांनी केली. पैशाची मागणी केल्यामुळे रावलकरांना संशय आला आणि त्या भामट्यांचं पितळ उघडं पडलं...
घडलेला प्रकार रावलकरांनी पोलिसांना सांगितला. पण मोबाईल नंबर आणि संबंधित बँक खातं बनावट कागदपत्रांवर उघडल्यांचं पोलिसांना तपासात आढळून आलंय. आता तो मोबाईल नंबरही बंद झाल्यानं पोलिसांचा तपास थंडावलाय.
डॉ. रवी रावलकरांना वेळीच संशय आल्यानं ते फसवणूक होण्यापासून वाचले. पण या भामट्यांच्या जाळ्यात बरेच जण अडकल्याची शक्यता आहे. त्यामुळे आपणही कुठल्या रिऍलिटी शोमध्ये सहभागासाठी धडपडत असाल आणि तुम्हालाही रावलकरांसारखा मेल किंवा एस.एम.एस आला.... तर जरा सावधान....!!!