ऐतिहासिक `पलंग बारव` दोनशे वर्षांनी कोरडा!

दुष्काळाची दाहकता जालन्यात आणखीच भीषण झाली आहे. दुष्काळामुळे विहिरी तर आटल्याच पण जालन्यात प्रसिद्ध असलेली दोनशे वर्षापूर्वीची पलंग बारवही या दुष्काळाचा बळी ठरली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 14, 2013, 10:39 PM IST

www.24taas.com, जालना
दुष्काळाची दाहकता जालन्यात आणखीच भीषण झाली आहे. दुष्काळामुळे विहिरी तर आटल्याच पण जालन्यात प्रसिद्ध असलेली दोनशे वर्षापूर्वीची पलंग बारवही या दुष्काळाचा बळी ठरली. पालिकाही ही बारव कोरडी पडायला दुष्काळाएवढीच जबाबदार आहे.
१० हजार लोक संख्येला पाणीपुरवठा करण्याची क्षमता असलेली ही जालन्यातल्या इंदिरानगर भागातली पलंग बारव. ही बारव म्हणजे आपल्या पूर्वजांच्या कलेचा उत्कृष्ट नमुना. या बारवाची मूळ खोली आहे अडीचशे फुट. अहिल्याबाई होळकर यांनी १८ व्या शतकात ही बारव बांधली. पलंगासारखा आकार आसल्यान या बारवेला पलंग बारव म्हणून ओळखल्या जात. गेल्या दोनशे वर्षाच्या इतिहासात ही बारव कधीही कोरडी पडली नसल्याचे इथले नागरिक सांगतात. पण यावर्षी दुष्काळान विहिरी नालेही कोरडे पडले. मग ही बारव तरी कशी पाण्याने भरलेली राहील. पण ही बारव कोरडी पडायला जालना पालिकेचा नियोजनशून्य कारभारही तेवढाच जबाबदार आहे. कारण पालिकेने आतापर्यंत एकदाही या बारवामधला गाळ उपसण्याच धाडस दाखवलं नाही त्यामुळे अडीचशे फुट खोल असलेल्या या बारवात गळ साचला. त्यामुळे हि बारव कोरडी पडायला पालिकाच जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

गेल्या २०० वर्षापासून नागरिकाची तहान भागवणाऱ्या ऐतिहासिक बारवाची डागडुजी करावी, असं सामंजस्य पालिकेने कधीही दाखवला नाही. त्यामुळं ही बारव कोरडी पडली आणि आता इथल्या नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. आता नागरिक ओरडू लागल्यावर या बारवातला गाळ लोक सहभागातून काढणार असल्याच पालिकेच्या प्रभारी मुख्याधिकाऱ्य़ांचं म्हणणंय. गरज आहे ती आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेला वारसा जपण्याची. निसर्गाच्या लहरीपणाला कोणालाही सावरता येणं शक्य नाही. पण नियोजनापुढे मात्र नक्कीच दुष्काळालाही हारवू शकतो, हेही तेवढंच खरं आहे.