www.24taas.com, कोल्हापूर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या सर्व इच्छा पूर्ण करणार असून महाराष्ट्राच्या विधानसभेवर मानाने भगवा फडकविणार असल्याची शपथ आज शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे घेतली. बाळासाहेबांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र घडविण्याची आपण शिवसैनिक म्हणून शपथ घेऊ या असेही आवाहन उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर प्रथमच राज्याच्या दौऱ्यावर उद्धव ठाकरे निघाले असून त्यांनी आज पहिली सभा कोल्हापूर येथे घेतली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मी काही दौरा काढण्यासाठी येथे आलो नाही, माझ्या प्रमाणे अनेक शिवसैनिकांना बाळासाहेब जाण्याचे दुःख झाले आहे. माझ्या कुटुंबाला भेट देण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. असे भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
दोन दिवसांपूर्वी मी सामनातून माझ्या भावनांना वाट करून दिली आहे. पुढील शंभर, दोनशे, पाचश आणि हजार वर्ष शिवसेनाप्रमुख म्हणून बाळासाहेब आणि बाळासाहेब यांनाच ओळखले जाईल. ते पद घेण्याचा विचारही माझ्या मनाला शिवला नाही. शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दुसरे होणे नाही, असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
बाळासाहेब म्हणायचे जोपर्यंत माझा कडवट शिवसैनिक जिवंत आहे, तोपर्यंत मी शिवसेनाप्रमुख आहे. त्यामुळे बाळासाहेब आजही तुमच्या माझ्यामध्ये जिवंत असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.
बाळासाहेब हताश बसलेले तुम्ही कधी पाहिले आहेत. मी तरी नेहमी लढणारे बाळासाहेब ठाकरे पाहिले आहे. अशा दैवताच्या पोटी मी जन्माला आलो याचे मी भाग्य समजतो. तुम्हांला दुःख झाले आहे, मलाही दुःख झाले आहे, पण रडत बसून चालणार नाही. परत या परत अशा आपण घोषणा देतो. त्यावर बाळासाहेबांनी विचार केला तर कशासाठी परत येऊ लढणाऱ्यासाठी येऊ का रडणाऱ्यासाठी येऊ तर ते रडणाऱ्यांसाठी नाही तर लढणाऱ्यांसाठी परत येतील.