www.24taas.com,मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थीकलश राज्यातील जिल्ह्यांमध्ये जाणार आहे. याची जबाबदारी संपर्क नेत्यांवर असणार आहे. गावागावांतील शिवसैनिकांना दर्शन घेता यावं यासाठी अस्थीकलश ठेवला जाणार आहे. २३ नोव्हेंबरला अस्थीकलशाचे विसर्जन करण्यात येणार आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थिकलश दर्शनासाठी मंगळवारी २० नोव्हेबरला १२ वाजता मुंबई दादरमधील शिवसेना भवनात ठेवण्यात येणार आहेत.
शिवतीर्थावर जमलेल्या जनसागराच्या साक्षीनं शिवसेनाप्रमुखांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार झाले. आज सोमवारी सकाळी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरून अस्थिकलश मातोश्रीवर आणला.
यावेळी मातोश्रीच्या परिसरात जमलेल्या शिवसैनिकांचा पुन्हा एकदा बांध फुटला. आपल्या लाडक्या दैवताचं ज्यांना अंत्यदर्शन घेता आलं नाही अशा गावागावांतील शिवसैनिकांना किमान अस्थीकलशाचं दर्शन घेता यावं, यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
मंगळवारी मुंबईतून अस्थिकलश जिल्ह्यातील प्रमुख आणि संपर्क नेत्यांकडे सोपवण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारपासून शिवसैनिकांना त्याचं दर्शन मिळेल. त्यानंतर २३ नोव्हेंबरला अस्थींचं विधिपूर्वक विसर्जन केलं जाईल.