www.24taas.com,मुंबई
मुंबईतील शिवाजी पार्क हे आमच्यासाठी शक्तिस्थळ आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवतीर्थावरील अंत्यसंस्काराची जागा ही तमाम शिवसैनिक आणि शिवप्रेमींसाठी शक्तिस्थळच आहे. हे शक्तिस्थळ पवित्र असून आमच्या श्रद्धेचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे ते आम्ही कदापी सोडणार नाही. तसेच येथील एकही वीट हलवू देणार नाही, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
शिवसेनाप्रमुख आणि शिवतीर्थ यांचे अतूट नाते आहे. सहा दशके राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात घोंगावणारे बाळासाहेब ठाकरे नावाचे वादळ याच शिवतीर्थाच्या कुशीत विसावले. येथूनच एक महाशक्ती अनंतात विलीन झाली. आमची श्रद्धा आणि अपार निष्ठा या शक्तिस्थळाशी निगडित भावना शिवसैनिकांची आहे. त्यामुळे शिवतीर्थावरील हे शक्तिस्थळ हटवू देणार नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
आम्ही कायदाचा आदर राखतो. मात्र, पालिकेने पाठविलेल्या पत्राला उत्तर द्यायला आम्हाला वेळ नाही. आम्हाला ते मिळेत त्यावेळी पुढे काय करायचे ते बघू, असे राऊत म्हणालेत.
दरम्यान, शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनीही शिवार्जी पार्क येथेच बाळासाहेबांचे स्मारक व्हावे, अशी ईच्छा व्यक्त केली आहे. तर बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराचा चौथरा काढण्यास कार्यकर्त्यांचा विरोध करत शनिवारी मुंबईतील शिवाजी पार्कवर हजारो शिवसैनिक दाखल झाले होते. आजही गर्दी पाहायला मिळाली. शनिवारी ठाण्यातून आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक दाखल झालेत. त्यामुळे अंत्यसंस्कार जागेचावाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.