मेघा कुचिक
बाळासाहेबांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी शिवाजी पार्कवर जनता, राजकारणी बॉलिवूड स्टार आणि उद्योगपतींनी आवर्जुन उपस्थिती लावली. मात्र, या दु:खद प्रसंगी खेळाडू आणि क्रिकेटपटूंची उणीव मात्र प्रकर्षाने जाणवली. त्यांच्यासाठी केलेली बाळासाहेबांची धडपड क्षणात डोळ्यात उभी राहिली. काय म्हणायचे या खेळाडूंना? स्वार्थी की आणखी काही....
बाळासाहेबांनी अनेकदा अनेक लहान-मोठ्या खेळाडूंना आर्थिक आणि इतर मदत केली. महाराष्ट्राचा खेळाडू जर चांगली कामगिरी करून परतला तर तो खेळाडू विमानतळावरून थेट मातोश्रीवर बाळासाहेबांचा आर्शीवाद घ्यायला जायचा. यावेळी हातचे काहीही न राखता बाळासाहेबाही या खेळाडूंचे भरभरून कौतुक करत. वेळप्रसंगी अनेक गरिब खेळाडूंना त्यांनी आर्थिक आणि इतर मदतही केली. भारताचा माजी हॉकीपटू धनराज पिल्ले हादेखील गरिब परिस्थितीतून आलेला. त्याला मुंबईत पवईसारख्या ठिकाणी बाळासाहेबांनी घर मिळवून दिलं. तर अजित वाडेकरांसारख्या माजी क्रिकेटपटूंच्या गौरवनिधीसाठी बाळासाहेबांनी क्रिकेट मॅचचे आयोजन केलं. यात काय बाळासाहेबांचा फायदा होता का. एक खेळाडू आहे. देशाचे नाव लौकिक करीत आहे. त्याला आशीर्वाद आणि जसे जमेल ते सहाय्य केले. याचे मोल शिवाजी पार्क उसळलेला जनसागर पाहून अनेकजण विसरलेले यावेळी दिसून येते.
मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत दि्वंगत विलासराव देशमुख यांच्यासारखा दिग्गज उमेदवार असतानाही शिवसेना माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली. अशी कित्येक उदाहरण आहेत की बाळासाहेबांनी क्रीडापटूंना या ना त्या परीने मदत केली. मात्र त्यांना अखेरीस हात जोडायलाही एकही खेळाडू फिरकला नाही यापेक्षा दुर्देव ते काय?
बाळासाहेब हे जसे राजकारणी होते तसेच ते एक कलाकारही होते. मात्र खेळाडू आणि क्रिकेटपटूंबद्दलही त्यांच्या मनात एक आपुलकी होती. या आपुलकीमुळेच त्यांनी अनेक महाराष्ट्रातील अनेक खेळाडूंना या ना त्या परीने नेहमीच मदत केली. मात्र त्यांची ही मदत हे खेळाडू आणि क्रिकेटपटू विसरले असचं म्हणाव लागेल. दरम्यान वेळ पडल्यास बाळासाहेबांनी सचिनसारख्या महान क्रिकेटपटूलादेखील खडे बोल सुनवायला मागे पुढे पाहिले नाही. काही वर्षांपूर्वी मुंबईतील वानखेडे स्टेडियमच पिच उध्वस्थ करण्यातही बाळासाहेबांना काहीही गैर वाटल नाही.
या सा-या घटनांमागे हिंदुत्त्व आणि हिंदुस्थानाचा असा एक जाज्वल्य अभिमान होता. मात्र तरीही बाळासाहेबांच्या मनात क्रीडा आणि खेळाडूंबद्दल एक भावना होती आणि ते एक सच्चे क्रिकेटप्रेमी होते. पाकिस्तानच्या जावेद मियाँदाजचे कौतुक करण्यास ते विसरले नाही. बाळासाहेबांच्या भेटीनंतर जावेदने ही बाब आवर्जुन सांगितली. त्यांचे खेळाविषयी असलेले प्रेम दिसून येते.
बाळासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर उसळला होता आणि देशातील दिग्गज राजकारणी आणि अमिताभही त्यांच्या अंत्यसंस्काराला जातीने हजर होते. तिथे हे खेळाडू आणि क्रिकेटपटू बाळासाहेबांना श्रध्दांजली वाहतो, अशी एक-दोन वाक्याची प्रतिक्रिया द्यायला एकतर उपलब्ध नव्हते किंवा उपलब्ध झालेच तर आज नको उद्या-परवा, अशी कारण देत होते. म्हणूनच या खेळाडूंचा आणि क्रिकेटपटूंचा निषेध करावासा वाटतो.