www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आपल्या विचारांचा प्रभाव आपल्या जीवनावर होत असतो, हे उघड उघड सत्य आहे. आपल्या जगण्याची दिशा आणि आपले नातेसंबंधांवरही आपल्या विचारांचाच मोठा प्रभाव असतो. त्यामुळे आपले विचार सकारात्मक राहण्याकडे आपलं कटाक्षानं लक्ष हवंय. नेहमीच आपले विचार सकारात्मक राहतात असं नाही. पण, असं घडू नये यासाठी आपल्याला कटाक्षानं लक्ष द्यायला हवंय. त्यासाठी काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवणं आवश्यक आहेत... पाहुयात काय काय आहेत या गोष्टी...
तुम्ही जन्मत: जसे होता, तसेच आहात. तुम्ही स्वत:ला जे बनण्यास सांगत आहात, तसे नाहीत. परफेक्ट बनण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही, तर सत्यासाठी आहे. तुम्ही जे आहात, ते सत्य आनंदाने स्वीकार करा.
लोक नेहमी ज्या गोष्टी स्वत:जवळ नाहीत, त्यांच्याविषयी तक्रार करत असतात. जे जवळ असते त्याविषयी कृतज्ञ नसतात. अशा लोकांच्या संगतीत कधीही राहू नका.
भय ही नगण्य गोष्ट असते. तुम्ही त्याविषयी विचार करत राहिल्यास तिला विशेष महत्त्व येते. भीतीच्या दलदलीतून आपले विचार मुक्त करा.
जुन्या चुका किंवा जखमांविषयी विचार करत राहिल्यास त्या बदलता येत नाहीत. असे केल्याने स्वत:लाच त्रास होतो. स्वत:ला निर्भय बनवा. पुढे जा. आयुष्यातील जुनी पाने वाचल्याने काहीच बदलणार नाही. भविष्यातील पानांविषयी विचार करा आयुष्य आनंदी बनेल.
आयुष्यभर इतरांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास हाती काहीच लागत नाही. बळजबरीने कुणावर प्रभाव पाडल्यास गर्व वाढेल. तुम्ही जसे आहात, तसेच राहा. एखाद्यावर प्रभाव पाडायचा तर आधी स्वत:वर प्रभाव पाडा. करिअरमध्ये पुढे जाऊन, नवे शिकून, ध्येय गाठून स्वत:वर प्रभाव पाडला जाऊ शकतो.
स्वप्न पाहणे किंवा त्यांच्याविषयी विचार करत राहिल्याने काहीच फरक पडत नाही. स्वप्न कृतीत आणण्याचा विचार करा. आज तुमच्याकडे अनेक संधी असतील तर उद्यासाठी एकही संधी बाकी ठेवू नका. काही लोक फक्त स्वप्न पाहत असतात, ते सत्यात उतरवण्याच्या दिशेने काहीही प्रयत्न करत नाहीत, अशी स्वप्न पाहिल्याने काहीच हाती लागत नाही. फक्त विचार केल्याने फायदा होत नाही. पाऊल उचला.
ज्या परिस्थितींवर नियंत्रण मिळवणे अशक्य असते, त्याविषयी विचार करणे व्यर्थ आहे. आयुष्यातील काही क्षण केवळ जगण्यासाठी असतात. विचार करण्यासाठी नव्हे. अशा क्षणांचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या.