राम तेरी अयोध्या मैली... भाग-२

  'राम'बाणाचा लक्ष्यवेध

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 19, 2017, 06:01 PM IST
राम तेरी अयोध्या मैली... भाग-२ title=

ब्लॉग :  'राम'बाणाचा लक्ष्यवेध

रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : भगवान श्रीराम नावावरून देशभरात राजकारण सुरू आहे. अयोध्येतून राजकारण वगळले तर काय उरतं ? तिथलं समाजजीवन कसं आहे ?   या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी अयोध्या गाठली. रामाची अयोध्या आहे तरी कशी, खरंच थोडंफार तरी रामराज्य उरलंय का अयोध्येत…? रामायणात दाखवलेल्या भव्य दिव्य नगरी प्रमाणे अयोध्या उरली आहे का,  अशा अनेक प्रश्नांसह अयोध्येत पोहोचलो. अयोध्येत प्रवेश करतानाच मोठी कमान लागली. या कमानीवर लिहिलं होतं... ‘प्रबिसीनगर कीजे सब काजा, हृदय राखि कोसलपुर राजा.' ... पावननगरी अयोध्या में आपका स्वागत है।‘ 

या ओळींचा अर्थ असा आहे की, 'अयोध्यानगरीत प्रवेश करताना हदयात भगवान श्रीरामाचे नाम ठेवावे. त्यामुळे तुमची सर्व कामे पूर्ण होतील. विष सुद्धा अमृत होईल आणि शत्रू सुद्धा मैत्री करतील.'

वाचा 'राम मंदिर, राम भरोसे' - भाग १

या कमानीच्या बाजूलाच प्रवेश ‘राम की पैडी’चं चित्र रेखाटलेलं दिसतं. बाजूलाच एक फलक लावलेला आहे... रामघाट ४ किमी., हनुमानगढी २ किमीवर., राम की पैडी ३ किमी., ब्रम्हकुण्ड गुरूद्वार २.५ किमी., राजघाट ३ किमी. आणि नयाघाट ४ किमी.... अयोध्येतील ही सर्वात महत्त्वाची ठिकाणं.

कमानीतून आत प्रवेश केल्या केल्या सुरूवातीलाच लागते, अयोध्या पोलिस चौकी. त्यानंतर रामदेव बाबा पतंजलीची जाहीरात करतानाचे मोठे पोस्टर दिसले. जिओनी, शाओमी कंपन्यांच्या पोस्टर्सनी रस्ताच्या दोन्ही बाजू भरलेल्या. त्यानंतर थेट मोर्चा वळवला तो राममंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांच्याकडे. सत्येंद्र दास यांच्याशी गप्पा सुरू केल्या. ते म्हणाले, ‘रामनवमीच्या दिवशीच मानवाच्या रूपात देव धरतीवर अवतार घेतात म्हणून रामनवमीचं महत्त्व आहे. म्हणजे अयोध्येत रामनवमीचा कालावधी हा सर्वात पवित्र.’ परंतू तेवढीच पवित्र अयोध्या आहे का…? या देवभूमीत काहीच समस्या नाहीत का... अयोध्येत नेमकं काय चाललंय...? हे जाणून घेण्यासाठी अयोध्येच्या कानाकोप-यात जायचं ठरवलं.
 

गौ’माता’ रस्त्यावर

अयोध्येत कुठूनही फिरताना जिथे तिथे कच-याचा ढिगंच पाहायला मिळतो. गायी ‘माता’ असल्याचं बजरंग दलाच्या संस्कारात असलं तरी अयोध्येत मात्र गायी या केवळ रस्त्यावर सोडलेल्या जनावर आहेत. हनुमान गढीच्या समोरच चार-पाच गायी गटारातील पाणी पित असल्याचं दिसलं. आसपास पूजा साहित्य विक्रीचे दुकाने आहेत. परंतू एकालाही गौमाता गटारातील पाणी पिताना दिसली नाही. हवं तर सोयीस्कर पद्धतीने डोळे झाकून घेतले, असं म्हणा. अयोध्येत अनेक ठिकाणी उघड्यावर गायी फिरताना दिसतात. प्लास्टिक पिशवी, कागद, खाताना गायी नजरेस पडतात. गायी बाजारात, चौका चौका फिरतात मग अयोध्येत गोशाळा नाही का ? हा प्रश्न पडतो.
गाय मेल्यानंतर तिच्यासाठी गळा काढणारे कार्यकर्ते अयोध्येत काय करत आहेत, असा प्रश्न मनात आला. अयोध्येतील भाजपच्या एसी कार्यालयात गायीचा फोटो लावून त्यात देव दाखवण्यात आले आहेत. सकाळी कार्यालयात आल्याबरोबर न चुकता या फोटोचं दर्शन घेतलं जातं. मात्र, भाजप, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद जिवंत गायीची देखभाल करण्यात प्रयत्नशील दिसत नाहीत. गायीमध्ये जर आई असेल तर आईला रस्त्यावर सोडून हिंदुत्ववादी संघटनेच्या लेकरांना काय आनंद वाटतो, हे समजत नाही. अयोध्येत यत्किंचितही रामराज्य अवतरलं नसल्याची खात्री झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्वच्छ भारत अभियान' हाती घेतलंय. या अभियानाकडे अयोध्येने पाठ केल्याचं दिसतं. कारण स्वच्छ भारत अभियानाची इथे अमलबजावणी केली जात नाही. विशेष म्हणजे इथे कट्टरवादी हिंदुत्व संघटना सक्रीय असूनसुद्धा. अयोध्येत सर्वत्र घाणीचंच साम्राज्य आहे. भगवान रामाच्या नावानं राजकारण करणाऱ्यांनी किमान आठवड्यातून एकदा तरी अयोध्या स्वच्छ करण्याचा प्रण घ्यायला हवा. इथली परिस्थिती पाहिल्यानंतर वाटलं की, या क्षणाला जर स्वतः भगवान राम अयोध्येत प्रकटले तर त्यांनाही नाक दाबून अयोध्येत फिरावं लागेल.

 

देवाच्या दारात भक्तांचे हाल  

अयोध्येत देशविदेशातून भगवान रामाच्या दर्शनासाठी भक्त येतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काय व्यवस्था केली आहे, हे जाणून घ्यायचं होतं. नागरिकांच्या आरोग्यासाठी इथे कोणत्या सोयी- सुविधा आहेत, हे पाहण्यासाठी मी सरकारी रूग्णालयाकडे निघालो. रूग्णालयात प्रवेश करतानाच एक रूग्ण बडबड करत बाहेर पडत होता. त्याच्या पूर्ण हातभर खरचटल्याचे व्रण होते. मी विचारलं, क्या दिक्कत है. तो म्हणाला, दिक्कत क्या साहब, यहां दवाईयाँही नही है। 
अयोध्येच्या आसपास खाणकाम सुरू असल्याने बाहेर गावाहून मोठ्या प्रमाणात कामगार इथे येतात. तिथल्या धुळीमुळे अनेकजण श्वसन विकाराचे बळी आहेत तर, बहुतांश लोकांना त्वचेच्या आजाराचा त्रास आहे. कामगारांना परवडणारं उपचाराचं ठिकाण म्हणजे सरकारी रूग्णालयच!, पण इथल्या सरकारी रूग्णालयात बारा महिने औषधांचा तुटवडा. एक रुग्ण तर तीन महिन्यांपासून औषधांसाठी फेऱ्या मारत होता. रूग्णालय फिरत असताना एका दरवाजासमोर लांबच्या लांब रांग लागलेली दिसली. इथंच एवढी गर्दी का, म्हणून विचारलं तर संपूर्ण रूग्णालयात एकमेव डॉक्टर होता. आणि तो तिथं बसलेला असल्याने तिथेच रांग लागलेली होती. गर्दीही इतकी प्रचंड की, सकाळी नंबर लावला तर संध्याकाळीच डॉक्टरांची भेट होते. रुग्णालयात कर्मचा-यांची संख्याही तुटपुंजी आहे. डॉक्टर, रुग्णसेविका पुरेसे नसल्यामुळे रूग्णाचे हाल होत आहेत. या भागात एकही मोठे हॉस्पिटल नाही. ईसीजी किंवा सोनोग्राफी सारख्या चाचण्यांसाठीदेखील लखनऊला जावं लागतं. अयोध्येत आरोग्याचा चांगलाच बोजवारा उडालेला दिसला. असं असताना समाजवादी सरकारनं एवढ्या वर्षात इथं नेमक्या काय सुविधा दिल्या, असा प्रश्नच पडला. सध्या अयोध्येत भाजपची सत्ता आहे. यापूर्वी समाजवादी पार्टीचे तेज नारायण पांडे हे इथे आमदार होते. त्यांना अखिलेश यादव यांनी वनराज्यमंत्री बनवले. मंत्र्यांचा मतदार संघ आणि भगवान श्रीरामाची जन्मभूमी या दोन्ही गोष्टी अयोध्यावासियांच्या पथ्यावर पडल्या नाहीत. अयोध्येतील प्रजेची काळजी घेणारा कोणीही मायबाप नसल्याचं दिसून आलं. अयोध्या पोरकीच राहिली.
 

मंदिर-मशीद नको, काम द्या

अयोध्येत मोठे उद्योगधंदे नसल्यामुळे छोटे उद्योग करूनच पोट भरावं लागतं. अयोध्येला सर्वाधिक महसूल हा पर्यटकांच्या माध्यमातूनच मिळतो. या ठिकाणी मुस्लिम समाजानेही पर्यटक आणि रामभक्तांना लक्षात घेऊन व्यवसाय निवडले आहेत. फुलांचे हार, बांगडया, रामाच्या पादुका तयार करण्याचा व्यवसाय मुस्लिम बांधवांनी स्वीकारला आहे. अयोध्येतील हनुमान गढी रस्त्यावरून काही अंतरावरच ‘डाकखाना’ रस्ता आहे. या रस्त्यावरच रामाच्या पादुका तयार केल्या जातात. मोहम्मद सलीम यांचा लाकडापासून पादुका तयार करण्याचा व्यवसाय याच रस्त्यावर आहे. साधू संत, महंतांच्या पायातील पादुका मोहम्मद सलीम यांनी हातानं तयार केलेल्या आहेत. एवढंच काय, तर मंदिरातील राम-लक्ष्मणाच्या पादुकासुद्धा सलीम यांच्याच दुकानातून जातात. त्यांनी केलेल्या पादुका सर्व मंदिरात अर्पण केल्या जातात. या रस्त्यालगतच सलीम यांची छोटशी झोपडी आहे. झोपडीच्या दरवाजावर रामाच्या पादुका लटकवलेल्या आहेत. तिथं पोहोचलो तेव्हा थोडंही विचलित न होता सलीम यांचं लाकूड तोडून ठराविक मापाच्या पादुका बनवण्याचं काम सुरू होतं. मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांना विचारलं, कितनी कमाई मिलती है?, ते म्हणाले १०-२० रूपये. मी म्हटलं, इतने कम पैसे मिलते है, तो दुसरा कोई काम क्यों नही ढुंढ लेते. त्यावर सलीम यांनी सांगितलं की, इथे दुसरं करण्यासारखं काहीच काम नाही. इथे श्रद्धाळू येतात आणि ते रामाच्या पादुका घेऊन जातात. यामुळे मला भगवान राम आणि भक्तांची सेवा करण्याची संधी मिळते. मी विचारलं राम मंदीरावरून तणाव निर्माण होतो का... त्यावर सलीम म्हणाले, “बाहेरचे लोकंच सगळं राजकारण करत आहेत. इथे हिंदु मुस्लिम शांतपणे राहतात. पण, मशिद असतानाही आमची आर्थिक परिस्थिती हलाखीचीच होती आणि आत्ताही तशीच आहे. आम्हाला मंदिर-मशिदीचा वाद नको, हाताला काम हवंय!”
 

अयोध्या औद्योगिक नगरी कधी बनणार?  

‘राम मंदिर आणि बाबरी मशिदचा वाद’ हीच अयोध्येची ओळख आहे. औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होण्यासाठी अयोध्येला बराच कालावधी जावा लागणार आहे. इथे अद्याप एकही उद्योग स्थापन झालेला नाही. फुलांचे हार-नारळ विक्री, रामाची मूर्ती, पूजेचे साहित्य यांची विक्री याशिवाय अयोध्येत उद्योगच नाही. या व्यवसायांमधून मिळणारे उत्पन्नही तसे तुटपुंजेच. रामनवमीच्या काळात नऊ दिवस अयोध्येत यात्रा असते. तो काळच इथल्या व्यापा-यांसाठी सुकाळ असतो. नऊ दिवस उलटले की, अयोध्या पुन्हा बकाल दिसायला लागते. बिसलरी कंपनीने काही वर्षांपूर्वी आपला एक प्लांट अयोध्येत सुरू केला. परंतू इथे दंगली झाल्या आणि प्लांट बंद पडला. सतत होणा-या दंगलींमुळे या संवेदनशील भागात कोणीही उद्योग सुरू करण्यास धजावत नाही. एका रात्रीत संपूर्ण प्लांट जळून खाक होण्याची भिती वाटण्यासारखीच परिस्थिती इथे उद्भवते. याच कारणामुळे, उद्योगपतींनीही अयोध्येकडे पाठ फिरविल्याचं दिसतं. उद्योगधंदे नसल्यामुळे इथल्या तरूणाईच्या हाताला काम नाही. याचा फायदा भाजप, व्हिएचपी आणि बजरंग दल यांसारख्या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेने पुरेपूर करून घेतला. मोकळ्या हातात आणि रिकाम्या डोक्यात हिंदुत्वाची नशा पेरण्याचं काम करण्यात आलं, तर दुसरीकडे समाजवादी पार्टीनं मुस्लिम तरूणांना एकत्र करून कट्टरतेचे धडे दिले. उद्योगधंद्या अभावी तरूणाईला बेरोजगारीचं ग्रहण लागलंय. ज्यांची पोटं भरली आहेत ते हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगली घडविण्याचं काम करतात. मात्र ज्यांची पोट अद्याप भरलेली नाहीत, ती उपाशी जनता काहीतरी मिळेल या आशेने लढतेच आहे. इथे मुद्दा उपजिविकेचाच आहे. पोटा-पाण्याचाच प्रश्न इथला खरा प्रश्न आहे. जगभरात नाव असलेली अयोध्यानगरी औद्योगिक नगरी बनल्याशिवाय इथला विकास होऊ शकत नाही. 
 

दुकान पेटलं पण जिद्द कायम

अयोध्येत मुस्लिमांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यातही उद्योग व्यवसाय करणारे बोटावर मोजण्याइतकेच! साडेतीन दशकांपासून हनुमानगढी मार्केटमध्ये शादीक अली यांचा शिवणकामाचा व्यवसाय सुरू आहे. त्यांच्या दुकानाचं वैशिष्ट्य म्हणजे, हनुमान गढीतील चौकातील शेकडो दुकानांमध्ये केवळ हे एकमेव दुकान मुस्लिम माणसाचं आहे. बाबू टेलर हे शादीक अली यांच्या दुकानाचं नाव. रामजन्मभूमीतील भगवान राम आणि लक्ष्मण यांचे कपडे शादीक भाईच शिवतात. अयोध्येतील प्रमुख संत, महंतांचे कपडेही शादीक भाई यांच्याकडेच शिवण्यासाठी येतात. १९८० सालापासून हे दुकान याच ठिकाणी आहे. मुस्लिम असल्यामुळे शादीक भाईंनाही त्रास झाला. छोट्या छोट्या कारणांवरून बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनं त्यांचं दुकान अनेकदा तोडलं. १९९० च्या दंगलीत तर दुकानातील सर्व मालही लुटला गेला होता. शादीक भाई म्हणतात, ‘’काम करणा-याला कोणता धर्म असतो का… फक्त काम करणं, हाच आमचा धर्म. त्यामुळे पुन्हा दुकान सुरू केलं. पण, १९९२ च्या दंगलीत दुकान पुन्हा लुटण्यात आलं. तेंव्हा मात्र आर्थिक परिस्थिती ढासळली होती. परंतू करणार काय? आम्हाला एकच काम येतं, शिवणकाम. म्हणून पुन्हा हळूहळू दुकान थाटलं.’’ इतर सगळी दुकानं हिंदुंची असल्याने त्यांची दुकान लुटली गेली नाहीत, केवळ शादीक भाईंनाच या दंगलींचा फटका प्रत्येवेळी सहन करावा लागला. मी त्यांना विचारलं, ‘तुम्हाला टार्गेट केलं जातंय, असं वाटतं का?’, त्यावर शादीकभाई म्हणाले, ‘’यहां हम मुस्लिम लोग बहोत कम है. मतलब ‘ऊंट के मुंह में जिरा’ के बराबर. अगर हिंदु भाईयों के दिल में कुछ गलत होता तो उन्होंने हमे यहां रहने भी नही दिया होता.’’
मार्केटमधील दुकानांची जागा हनुमान गढी संस्थेच्या मालकीची आहे. त्यांच्याकडूनच बाबू टेलर यांनी हे दुकान भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी घेतलं होतं. राम, लक्ष्मण, हनुमानाचे कपडे शिवल्यानंतर ते हनुमान गढीवर जाऊन कपडे देतात. मुस्लिम असूनही हनुमान गढीत त्यांना प्रवेश आहे. पोट भरण्यासाठी धर्म आडवा येत नाही, हे शादीक भाई यांच्या कामावरून दिसून येतं. शादीक भाई यांच्या हातातील जादूमुळेच कपडे चांगले बनतात. कपडे शिवण्याबरोबरच मन जोडण्याचं कामही ते करत आहेत.

अयोध्येतील लोकांना राम मंदिर उभारण्यापेक्षा पोटाला भाकर हवी आहे. तेथील तरूणांना रोजगार तर रूग्णांना हॉस्पिटल हवं आहे. कोणत्याही सुविधांचा लवलेशही नसलेली अयोध्या खरंच रामाची अयोध्या राहीली आहे का, हा विचार येथील राजकारण्यांनी करायला हवा. अयोध्येतच राम मंदिर बनायला हवं, असं कधीही अयोध्या न पाहिलेल्या सिझनल राम भक्तांना वाटतं. परंतू अयोध्येत सोयी-सुविधेचा मुद्दा मांडणारे पुढे येताना दिसत नाही. केवळ अयोध्येत स्वच्छता मोहीम हाती घेऊनही उपयोग नाही, तर दुस-या धर्माविषयी वर्षानुवर्षे मनात साचलेला कचरा काढून देण्याची हिम्मत दाखवावी लागणार आहे. मन स्वच्छ करण्याची मोहीम हाती घ्यावी लागेल.
 
क्रमशः