नाना, मकरंद अनासपुरे ग्रामीण जनतेचे खरेखुरे हिरो

(जयवंत पाटील, झी 24 तास) महाराष्ट्राचे आजचे खरे हिरो जर कुणी असतील तर ते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे. ग्रामीण महाराष्ट्रांची संवेदना या दोन व्यक्तींना जाणवली. ग्रामीण जनतेनेही नाना आणि मकरंद अनासपुरे यांचे भरभरून आभार मानलेत, गावच्या पोरांच्या मनात नानांची आणखी एक वेगळी प्रतिमा उभी राहिली आहे.

Updated: Aug 11, 2015, 08:31 PM IST
नाना, मकरंद अनासपुरे ग्रामीण जनतेचे खरेखुरे हिरो title=

मुंबई : (जयवंत पाटील, झी 24 तास)

एलबीटी रद्द म्हणजेच माफ करून कोट्यवधी रूपयांचा दिलासा ८ लाख व्यापाऱ्यांना देण्यात आला, मात्र शेतकऱ्यांना मदतीची नुसती घोषणा होते, बळीराजाजवळ पैसे पोहोचण्याआधीच अनेकांच्या पोटात खवखव होते, अशांचा आता कंठ देखील फुटत नाही.

मराठी मीडियात एक-दोन जण सोडले, तर व्यापाऱ्यांना देण्यात आलेल्या एलबीटी माफीविरोधात कुणाचाही कंठ फुटला नाही. 

जरा नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्याकडून शिका

महाराष्ट्राचे आजचे खरे हिरो जर कुणी असतील तर ते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे. ग्रामीण महाराष्ट्रांची संवेदना या दोन व्यक्तींना जाणवली. ग्रामीण जनतेनेही नाना आणि मकरंद अनासपुरे यांचे भरभरून आभार मानलेत, गावच्या पोरांच्या मनात नानांची आणखी एक वेगळी प्रतिमा उभी राहिली आहे.

भूमिका जगणारे अभिनेते
पडद्यावर फक्त ग्रामीण भूमिका साकारली नाही तर ही भूमिका आम्ही जगू शकतो, त्यांचं दु:ख वाटून घेऊ शकतो, हे मकरंद अनासपुरे यांनी दाखवून दिलं आहे. ग्रामीण जनता ही कलाकारांकडून काही मोठी अपेक्षा करत नाही, या दोन्ही लोकांचं जीवन तसंच अनिश्चित, नफा-तोटा काय होणार हे तसं ठरलेलं नसतं.

पैशांपेक्षाही भावनेला मोल
बीड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी प्रत्येकी 15 हजार रूपयांची मदत केली. मदत केली हे सर्वात महत्वाचंय, पैसा नाही तर भावनेला मोल आहे. सरकारचीही शेतकऱ्यांला मदत मिळाली नाही तरी चालेल, पण सरकारची आमच्या बद्दलची भावना चांगली असावी, हीच ग्रामीण जनतेची इच्छा आहे. कारण भावना जगण्याची उमेद देतात.

भेदाभेदला बेस तरी आहे काय?
कारण आजकाल स्वत:ला वृत्तपत्राचा मानदंड समजणारे, 'बळीराजाची बोगस बोंब' असं लिहून गरीब शेतकऱ्यांवर आसूड ओढतात, लहान शेतकरी, मोठा शेतकरी असा भेद निर्माण करतात.

आपण लहान शेतकऱ्यांचे कैवारी आहोत असं त्यांना सांगायचं असतं, पण लहान शेतकरी, मोठा शेतकरी, बागायती, जिरायती असा क्लासचं नाही हे यांना कोण सांगणार? नुकसान सर्वांचंच होतं, जेवढं क्षेत्र मोठं तेवढं नुकसान मोठं. मोठं क्षेत्र असलेले शेतकरी लवकर संपतायत, दुष्काळात ही संख्या वाढते.

दिशाभूल किती दिवस करणार
आम्ही सर्व ज्ञानी महाराष्ट्राच्या जनतेला काही कळतच नाही असं समजणारे, विदर्भ विकास पॅकेज, खान्देश विकास पॅकेज, मराठवाडा विकास पॅकेज हे शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी सरकारने दिले, कोट्यवधी रूपये कसे शेतकऱ्यांवर खर्च झाले, असं लिहून अवघ्या महाराष्ट्राची दिशाभूल होत नाही का?.

शेतकऱ्यांना वीज बिल माफ कधीच झालं नाही, तरीही वीज बिल माफीचा उच्चार करतात, या उलट अंदाजे बीलं देऊन त्यांना किती लूटलंय, हे कधीही कुणी विचारत नाही.

एलबीटी माफ विरोधात कंठ फुटला नाही
एलबीटी कर रद्द नाही, तर व्यापाऱ्यांना तो माफ करण्यात आला, 8 लाख व्यापाऱ्यांना एलबीटीची माफी झाली असं मांडायला, धारेवर धरायला कुणीच आलं नाही. एक-दोन वगळता कुणाचाही कंठ फुटला नाही. महत्वाचं म्हणजे विरोधकांचाही नाही.

मात्र शेतकऱ्यांना मदत जाहीर झाल्याची नुसती घोषणा झाली, तरी थयथयाट का?, सरकारने मदत दिलीच पाहिजे, यासाठी कोणत्याही शेतकऱ्याने पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाल्ल्या नाहीत. सरकार का मदत देतं हे सरकारला विचारा, शेतकऱयांना दोष का?..

अज्ञानाची बोंब नाही, भावना महत्वाची
मात्र अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी शेतीवर काम करणाऱ्या भारताच्या आधुनिक गुलामाचं चित्र पाहिलं, ते संवेदनशील अभिनेते म्हणावे लागतील, ते हळहळले, म्हणून त्यांनी मोठ्या भावनेने हात पुढे केले, भावना महत्वाची आहे, अज्ञानाची बोंब नाही.

'एलबीटी'विषयी झी २४ तासची बातमी

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.