close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

संकल्पांचा संकल्प

नवे वर्ष सुरु व्हायला अवघे काही तास उरलेत. नवीन वर्ष कसे असेल याची आपल्याला उत्सुकता असतेच मात्र त्याचबरोबर नव्या वर्षात कोणता नवा संकल्प करायचा याच्या विचारात आपण असतो.

Updated: Dec 30, 2016, 02:52 PM IST
संकल्पांचा संकल्प

मुंबई : नवे वर्ष सुरु व्हायला अवघे काही तास उरलेत. नवीन वर्ष कसे असेल याची आपल्याला उत्सुकता असतेच मात्र त्याचबरोबर नव्या वर्षात कोणता नवा संकल्प करायचा याच्या विचारात आपण असतो.

दरवर्षी प्रत्येकजण नववर्षाच्या पूर्वसंध्येला कोणता ना कोणता संकल्प करतातच. ही जणू एक प्रथाच असते. तो संकल्प वर्षभरात पाळला जावो वा न जावो. मात्र संकल्प केलाच पाहिजे. 

यावर्षीही अनेकांनी संकल्पांचे संकल्प नक्कीच केले असतील. व्यसन करणाऱ्यांनी दारु सोडण्याचा संकल्प, डायरी लिहिण्याचा संकल्प, वजन कमी करण्याचा संकल्प असे नाना तऱ्हेचे संकल्प या पूर्वसंध्येस जन्म घेतात. मात्र ते किती पाळले जातात हे संकल्प करणारेच जाणोत. 

दरवर्षी संकल्पांच्या यादीत नवनव्या संकल्पांची भर पडत जाते आणि ही यादी वाढतच जाते. पहिल्या दिवशी कठोर नियमाने संकल्प पाळला जातो. दुसऱ्या दिवशीही तेच घडते मात्र जसजसा आठवडा सरत जातो तसा संकल्पाची नवलाई संपत जाते. म्हणतात ना नवलाईचे नऊ दिवस. त्याचप्रमाणे या संकल्पांचे असते. संकल्पाचे नऊ दिवस संपले की आयुष्य पुन्हा जैसे थे...

त्यानंतर आपल्याला या संकल्पांची थेट आठवण होते ती वर्षाच्या अखेरीस. वर्षानुवर्षे हे चक्र असेच सुरु आहे. जणू काही निसर्गचक्रच...मात्र हे निरीक्षण काही सगळ्यांच्याच बाबतीत लागू होते असे नाही बरं का...

जे आपल्या निर्णयावर ठाम असतात, ज्यांचा निर्धार पक्का असतो त्या व्यक्ती हे संकल्प तडीस नेतातच. एखादी गोष्ट सुरु करणे फारसे कठीण नसते कठीण असते ते त्यात सातत्य टिकवणे. हे जमले म्हणजे तुमचा संकल्प पूर्ण झालाच म्हणून समजा...

मग तुम्ही काय ठरवलयं. नवेनवे संकल्प करणार की संकल्प पाळण्यात सातत्य ठेवणार...नव्या वर्षाची पार्टी नक्कीच एँजॉय करा. मात्र त्याचबरोबर संकल्पामध्ये सातत्य ठेवण्याचे वचनही स्वत:च स्वत:ला द्या. म्हणजे पुढच्या वर्षी नवा संकल्प करायला जाल तेव्हा जुना संकल्प पूर्ण झाल्याचा आनंद तुम्हाला नक्कीच असेल.