चेंबूर ते मांडवा : माझा ‘अग्निपथ’ पर्यंतचा प्रवास

‘आपण आपल्या संस्कृतीशी जेवढे एकनिष्ठ असतो तेवढे आपण वैश्विक होत जातो’ या संत परंपरेतील अध्यात्माची प्रचिती मला अग्निपथच्या वेळी आली. एक हिंदी स्क्रिप्ट आशुतोष गोवारीकरांना ऐकवली होती.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 4, 2012, 01:57 PM IST

अविनाश घोडके
परवा एका कार्यक्रमात प्रसिद्ध सिनेपत्रकार दिलीप ठाकुरजी भेटले. दिलीपजींचा अग्निपथ संदर्भातील एक लेख वाचून मी त्यांना एक इ-मेल पाठवला होता. कार्यक्रमात माझी अग्निपथ संदर्भातील ओळख निवेदिकेनी सांगितली आणि दिलीपजींनी कार्यक्रम संपताच पुढे येवून छान हसत हस्तांदोलन केले. आम्ही बोलू लागलो. विषय मांडव्याचा होता. दिलीपजींनी आपल्या त्या लेखात असे नमूद केले होते कि जुन्या `अग्निपथ` चित्रपटाचे दिग्दर्शक मुकुल आनंद यांनी `अग्निपथ` चित्रपटाच्या ही खूप आधी संजय दत्त बरोबर एक चित्रपट केला होता व त्या चित्रपटाचे चित्रीकरण त्यांनी अलिबाग जवळील मांडवा या गावी केले होते. मी दिलीप ठाकुरांना त्यांनी दिलेल्या लेखातील माहितीबद्दल धन्यवाद दिले ...मुकुल आनंदजींना अग्निपथ चा नायक `विजय दिनानाथ चौहान `याच्या गावाचं नाव मांडवाच का ठेवावं वाटलं असावं? ...या प्रश्नाचं उत्तर ठाकुरांच्या त्या लेखात मिळत होतं.
मांडवा गाव मुकुल आनंद यांनी बघितलेलं होतं. मुंबई पासून समुद्रमार्गे दीड एक तासाच्या अंतरावर हे गाव आहे .हे खरे मांडवा गाव अग्निपथ मधल्या `मांडवा` गावचे भौगोलिक संदर्भ तंतोतंत दाखवते. पटकथेत उल्लेखले गेलेले `मांडवा गाव` ते हेच असण्याची खात्री या संदर्भांवरून पटते. असं असूनही दोन्ही अग्निपथ चित्रपटांचे चित्रीकरण मात्र खऱ्या मांडवा गावात झालं नाही. अग्निपथ २ च्या संवादाच्या पहिल्या आवृत्ती मध्ये कमिशनर गायतोंडे मांडव्याच लोकेशन सांगताना मुंबईपासून दीडशे किलोमीटरचं अंतर सांगत होते. मी ते बदलून "मुंबई से कुछ हि दूरीपर" अशी सुधारणा केली. अगदी तेव्हापासूनच `मांडवा गावाला जावून यावं` अशी इच्छा मनात घर करू लागली होती. शेवटी अग्निपथ रिलीज होण्याच्या एक दीड महिना आधी एक दिवस मी मांडव्याकडे कूच केली.

गेटवे ऑफ इंडिया वरून बोट मांडव्याकडे जाताना मला माझ्या करिअरचा अग्निपथ पर्यंतचा १२-१३ वर्षांचा प्रवास आठवत होता. आविष्कारचं जयदेव हट्टंगडी यांचं शिबीर आठवलं. यवनीका या ग्रुप मधून केलेल्या एकांकिका आठवल्या. मला आठवले; महेश एलकुंचवार लिखित `होली` या एकांकिकेत `श्रीवास्तव` चे पात्र मी रंगवत होतो. रिहर्सल मध्ये एका प्रसंगात बेंबी च्या देठापासून ओरडनं होत होतं. हे ओरडणं फार उत्साहाने होत होतं. कारण खालसा कॉलेजच्या ज्या मंचावर आम्ही रिहर्सल करत होतो त्या मंचावर राज कपुरजींनी आणि दिलीप कुमारजींनी कॉलेज जीवनात नाटकं केली होती असं कळालं होतं. आपण कुठेतरी हिंदी सिनेमाशी कनेक्ट होतोय असं वाटत होतं. पण हे कनेक्शन प्रस्थापित व्हायला एवढी वर्षं जातील अशी कल्पना तेव्हा नव्हती. विचार गत काळात घेवून जात होते आणि बोट मांडव्याकडे झेपावत होती.
‘कुली’ चित्रपटातील अपघातानंतर अमितजींनी जो पहिला चित्रपट केला होता तो `अग्निपथ`. अमितजींना मी आयुष्यात पहिल्यांदा प्रत्यक्ष बघितले होते ते कुली चित्रपटाच्या दही-हंडी च्या गाण्याच्या चित्रीकरणा दरम्यान. या गाण्याचे चित्रीकरण चेंबुर जवळ ट्रोम्बे येथे झाले होते. पुढे काही वर्षांनी याच लोकेशनवर मी श्याम बेनेगल यांच्या एका सिरिअल साठी स्थिरचित्रणकार म्हणून हातात श्रीधर गायतोंडे या मित्राचा `पेंटयाक्स के १००० ` कॅमेरा घेवून उभा होतो.गुरुदत्त यांच्या `प्यासा` चे छायाचित्रकार व्ही.के. मूर्ती यांना बेनेगलजींसाठी छायाचित्रण करताना बघण्याचं भाग्य मला इथे लाभलं. व्ही. के.मूर्ती यांचं मी इतकं निरीक्षण करत होतो कि शिफ्टींगच्या वेळी आता ते कुठल्या कोनातून शूट करणार याचा अंदाज मला आधीच येऊ लागला. त्यांचा कॅमेरा नव्या स्पॉटवर पोहोचण्याआधीच मी तिथे पोहोचू लागलो होतो. फिल्म इंडस्ट्री मधला हा माझा पहिला पेड-जोब होता.

पुढे काही मराठी मालिकांचे स्थिर चित्रण मी केले. मोठ्या भावाने `बेटा कॅम कॅमेरा आणि हायबँड रेकॉर्डर` शुटिंग साठी भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरु केला तेव्हा मी ` कॅमेरा अटेंडंट` म्हणून शूट्स वर जाऊ लागलो.या काळात रोज वेग वेगळ्या प्रकारचे शूटिंग बघायला मिळत असे. गोरेगावला एकदा फिल्मिस्तानमध्ये जाहिरातीचं चित्रीकरण आम्ही करत होतो. मला असे कळाले की बाजूच्या फ्लोअरवर प्रत्यक्ष मुकुल आनंद `त्रिमूर्ती` या चित्रपटाचे चित्रीकरण करीत आहेत. मी वेळ काढून तिकडे डोकवायला गेलो. शुटींग मध्