www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेता हृतिक रोशनवर आज ब्रेन सर्जरी करण्यात येणार आहे. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये हृतिकला दाखल करण्यात आलं असून डॉक्टर बि. के. मिश्रा हृतिकची सर्जरी करणार असल्याचं समजतंय.
हृतिक रोशनला आज सकाळी दहाच्या सुमारास हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या मेंदूची एन्डोस्कोपी करण्यात येणार आहे. हृतिकने स्वत:च फेसबुकवरून या ऑपरेशनबद्दल माहिती दिलीय. हृतिकने मागील आठवड्यातच ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर हृतिक जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबियांसोबत होता. काल रात्री हृतिकने आपल्या मुलांनाही या ऑपरेशनची कल्पना दिली. तसेच आपली काळजी करू नका, असेही सांगितलं. आज पहाटे सहाच्या सुमारास त्याने फेसबुकवरून चाहत्यांना एन्डोस्कोपी ऑपरेशनसाठी रुग्णालयात दाखल होत असल्याचे सांगितलं.
`माझ्या मेंदूचा वापर करून मी आजवर अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी साकारल्या. मेंदू हा आपल्यासाठी सर्वकाही आहे. मेंदूमुळेच आपण कल्पनेपलीकडच्या गोष्टी करू शकतो. त्यामुळे कधीतरी आपण स्वत:मध्ये डोकावून आपल्या मेंदूचे महत्त्व जाणून घ्यायला हवं. मला आता या शक्तीचा अनुभव घ्यावा लागणार आहे. माझ्या मेंदूचे आज ऑपरेशन आहे. लवकर बरा होईन अशी आशा आहे. या इच्छाशक्तीसह मी ऑपरेशनला समोरा जात आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा. धन्यवाद` असं हृतिकनं फेसबुकवर म्हटलंय.
दरम्यान, शुटिंग करताना हृतिकच्या मेंदूला जखम झाली होती आणि त्यामुळेच हृतिक ही सर्जरी करावी लागतेय. मात्र, ही सर्जरी गंभीर नसल्याचं राकेश रोशन यांनी म्हटलंय. तेव्हा हृतिकच्या फॅन्सनी घाबरुन जाऊ नये, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.