www.24taas.com, नवी दिल्ली
अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि रणबीर कपूर ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर ’ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातून एकत्र दिसणार आहेत. याचबद्दल बोलताना दीपिकानं रणबीरबरोबर आपल्या नात्याची कबुली देऊन टाकलीय.
रणबीर-दीपिकाच्या ब्रेकअपनंतर ही जोडी पुन्हा एकत्र दिसेल असं खचितच कुणाला वाटलं असेल. पण दोघंही भलतेच प्रोफेशनल निघाले. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी बाजुला सारून दोघांनी करिअर दृष्टीकोनातून या सिनेमात एकत्र काम करण्यास होकार दिला. याबद्दल बोलताना दीपिका म्हणते, ‘आमच्या दोघांमध्ये नातं निर्माण होऊ शकलं नाही, पण आमच्या दोघांची मैत्री आयुष्यभर आमची सोबत करेल’. यावेळीच दीपिकानं रणबीरसोबतच्या नात्याची कबुली देताना ‘होय, मी आणि रणबीर एका भावनिक नात्यात गुंफले गेलो होतो’ अशीही स्पष्टोक्ती दिली. पण, आता मात्र आम्ही एकमेकांचे मित्र-मैत्रिण आहोत आणि कायम राहू. आम्ही दोघं एकमेकांना खूप जवळून ओळखतो आणि शूटींगदरम्यान आम्ही एकमेकांसोबत खूप चांगला वेळ व्यतीत केला.
२००८ साली प्रदर्शित झालेल्या ‘बचना-ए-हसीनों’मध्ये रणबीरसोबत दिसलेली दीपिका म्हणते, ‘आम्ही जेव्हा सेटवर असतो तेव्हा आपापल्या भूमिकांमध्ये असतो. मी जेव्हा माझ्या भूमिकेत असते तेव्हा खाजगी जीवन बाजूला ठेऊनच मी सेटवर उभी राहते.’
२७ वर्षीय अभिनेत्री दीपिकाच्या येत्या काही काळात तीन चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये ‘ये जवानी है दीवानी’कडून भरपूर अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. या सिनेमात आदित्य रॉय कपूर आणि कल्कि कोचलिनही रणबीर-दीपिकासोबत दिसणार आहेत. ३१ मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होईल.