www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आपल्या विनोदानं मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर आगळीवेगळी छाप सोडलेले अभिनेते सतीश तारे यांचं आज निधन झालं. जुहूच्या सुजय हॉस्पिटलमध्ये सतीश तारे यांनी अखेरचा श्वास घेतला.
वाशीत 'गोलगोजिरी' नाटकाच्या प्रयोगादरम्यान त्यांच्या पायाला जखम झाली होती. त्यावर वेळीच उपचार न केल्यामुळे पायाला गँगरीन झालं. तारेंना मधुमेहाचा त्रास असल्यानं उपचारातल्या अडचणी वाढल्या. त्यात त्यांच्या यकृतातही बिघाड झाल्यानं अखेर आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
अनेक नाटकं, सिनेमा आणि मालिकांमधून त्यांनी भूमिका केल्या. केवळ अभिनयच नाही तर लेखन आणि गायनातही त्यांचा हातखंडा होता. अत्यंत हजरजबाबी, टायमिंगचा बादशाह अशी त्यांची ओळख होती. एका हरहुन्नरी कलावंताला गमावल्यामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी दादरच्या शिवाजी मंदिर इथे ठेवण्यात येणार आहे.
पायाची जखम, मधुमेह आणि यकृतात बिघाडानं त्रस्त असलेल्या तारे यांना मंगळवारीच रुग्णालयात दाखल करण्यात होता. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. सध्या त्यांचं `गोलगोजिरी` हे नाटक सुरु होतं. पायाला झालेल्या जखमेनंतर काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पायावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
बालक पालक, नवरा माझा नवसाचा, वळू, शामची मम्मी, ऑल लाईन क्लिअर, भेंद्र्याचा वाघ आदी चित्रपटात त्यांचा कसदार अभिनय पाहायला मिळाला. झी टीव्हीवरील 'फू बाई फू'च्या गेल्या पर्वात त्यांनी आपला अविस्मरणीय सहभाग नोंदवला होता.
विनोदी भूमिका साकारताना 'अचूक टायमिंग' साधण्याचे कौशल्य त्यांच्यामध्ये होते. अभिनयाबरोबरच लेखक आणि गायक म्हणूनही ते प्रसिद्ध होते. सारेगमपमधून ते गायक म्हणून प्रेक्षकांच्या समोर आले होते. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त होत आहे.
सतीश तारे यांच्या कारकीर्दिवर एक नजर
हरहुन्नरी, विनोदी कलावंत अशी सतीश तारे यांची ओळख होती. त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा त्यांच्या नाटकांवर, चित्रपटांवर आणि मालिकांवर दिसून येतो.
गाजलेली नाटके : ऑल लाईन क्लिअर, श्यामची मम्मी, शुभ बोले तो नारायण, जादू तेरी नजर, आसामी आसामी, सगळं कसं गुपचूप, रात्रीच घोटाळा झाला, आम्ही बिघडलो, चल घेऊन टाक
गाजलेले चित्रपट : जैत रे जैत, नवरा माझा भवरा, नवरा माझा नवसाचा, वळू, बालक पालक
गाजलेल्या मालिका : एका लग्नाची दुसरी गोष्ट, 'फू बाई फू'
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.