www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूड अभिनेता ओम पुरी यांच्याविरुद्ध अंधेरीमध्ये पत्नीला मारहाण केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. हा आरोप त्यांची पत्नी नंदिता ओम पुरी यांनीच नोंदविलाय. यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल करून ओम पुरी यांना फरार म्हणून घोषित केलंय.
वर्सोवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक हरिश्चंद्र परमाळे यांच्या म्हणण्यानुसार, ओम पुरी यांची पत्नी नंदिता पुरी यांनी गुरुवारी रात्री उशीरा पोलिसांशी संपर्क केला. आपल्या घरी पतीनं आपल्याला काठीनं बेदम मारहाण केल्याची तक्रार नंदिता यांनी पोलिसांकडे केली. यानंतर पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली.
६२ वर्षीय अभिनेता ओम पुरी यांच्याविरुद्ध कलम ३२४, ५०४ आणि ५०६ (धमकावणं) या कलमांद्वारे गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय. सध्या ते फरार असल्याचं पोलिसांकडून घोषित करण्यात आलंय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरी पती-पत्नीमध्ये अंधेरीच्या वर्सोवा भागातील ‘सेव्हन बंगलो’स्थित ‘त्रिशुल’ या इमारतीतल्या आपल्या फ्लॅटच्या संबंधात बाचाबाची झाली. त्यानंतर रागावलेल्या ओम पुरी यांनी गुरुवारी रात्री साधारणत: नऊच्या दरम्यान नंदिता यांना काठीनं मारहाण केली. त्यानंतर रात्री ११च्या सुमारास नंदिता यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.