www.24taas.com, झी मीडिया, पुणे
येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याचा आज वाढदिवस... आज संजय दत्त दुसऱ्यांदा आपला वाढदिवस तुरुंगातच साजरा करणार आहे. यापूर्वी १९९५ मध्येही त्याला आपला वाढदिवस तुरुंगातच साजरा करावा लागला होता.
अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला साडे तीन वर्षांची शिक्षा भोगायचीय. सध्या तो पुण्याच्या येरवडा कारागृहात बंदिस्त आहे. आज संजय दत्त ५४ वर्षांचा झालाय. मात्र, या दिवशी त्याचे नातेवाईक त्याला भेटू शकणार नाहीत. येरवडा कारागृहाच्या नियमानुसार नातेवाईकांना आरोपीला महिन्यातून एकदाच भेटण्याची मुभा आहे. मात्र, संजयची पत्नी मान्यता संजयला या महिन्यात भेटली आहे. त्यामुळे संजयला त्याच्या नातेवाईकांना भेटता येणार नाही.
गेल्या आठवड्यात संजयची पत्नी मान्यता हिचा वाढदिवस होता. यावेळी संजयनं तिला तुरुंगातूनच एक गुलाबाचं फूल धाडलं होतं. मान्यताच्या प्रत्येक वाढदिवसाच्या वेळी संजय तिच्यासोबतच होता. पण, यावेळी मात्र मान्यताला संजयशिवाय तिचा वाढदिवस साजरा करावा लागला.
२९ जुलै १९५९ रोजी जन्मलेल्या सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या या मुलानं बॉलिवूडमध्ये नाव कमावलं.... अनेक वादांतही तो अडकला आणि त्याचं नाव चर्चेत राहिलं. १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोट हल्ला प्रकरणात अवैध हत्यारं बाळगल्याप्रकरणी शिक्षा सुनावल्या गेल्यानंतर संजयनं १६ मे रोज टाडा कोर्टासमोर शरणागती पत्करली. संजय दत्तनं आत्तापर्यंत ६९ दिवस तुरुंगात घालवले आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.