www.24taas.com, झी मीडिया, पुणे
गेली अनेक वर्षे रुपेरी पडदा गाजवणाऱ्या संजय दत्तची हिरोगिरी आता बालगंधर्व रंगमंदिराच्या रंगमंचावरही दिसणार आहे. येरवडा जेलमधील कैद्यांचा सहभाग असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात संजय दत्त महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात हा कार्यक्रम सादर होणार आहे. संजय दत्तसहीत तब्बल ५० कैद्यांचा या कार्यक्रमात सहभाग असेल. येरवडा तुरुंगाकडून सादर करण्यात येणाऱ्या `वेलफेअर फंडा`च्या सांस्कृतिक कार्यक्रमात संजय दत्त नाटिका, मिमिक्री आणि नृत्य सादर करणार आहे. तुरुंग विभागाच्या कल्याणकारी योजनांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी अभिनेता तो हातभार लावणार आहे.
कायर्क्रमाची संकल्पना, दिग्दर्शन, लेखन, अभिनय अशा साऱ्या गोष्टींची जबाबदारी कैद्यांकडेच सोपवण्यात आलीय. कैद्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाची आखणी करण्यात आलीय. या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा संजय दत्तनं व्यक्त केली होती. जेल प्रशासनाने ती मान्यही केली.
गेले काही दिवस या कार्यक्रमाच्या जोरदार तालमी सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी जेलच्या भिंतीआड सादर झालेला हा कार्यक्रम २६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात सादर होणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.