‘टायगर’ला दत्तक घेणार टायगर!

एक था टायगरद्वारे बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या सलमान खानला आता एक ऑफर आलीय. नाही नाही... ही ऑफर त्याला एखाद्या सिनेमाची नाही तर ही ऑफर आहे एक वाघ दत्तक घेण्याची...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 9, 2012, 09:31 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
एक था टायगरद्वारे बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या सलमान खानला आता एक ऑफर आलीय. नाही नाही... ही ऑफर त्याला एखाद्या सिनेमाची नाही तर ही ऑफर आहे एक वाघ दत्तक घेण्याची...
सलमान खानच्या ‘एक था टायगर’ या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड तोडलेत. ‘टायगर’चा हाच करोडोंचा बिझनेस लक्षात घेऊन एका प्राणी संग्रहालयानं सलमानला एक वाघ दत्तक घेण्याची विनंती केलीय. यासाठी त्यांनी सलमानला पत्रही लिहिलंय आणि लवकरच याला होकारही देणार असल्याचं समजतंय. प्राणीसंग्रहालयाच्या अध्यक्ष रेणू सिंह यांनी ही माहिती दिलीय.
‘सलमान खानचा एक था टायगर हा सिनेमा सुपर डूपर हिट झालाय आणि त्यामुळेच सलमानच्या काही फॅन्सनं त्याला टायगरची उपाधीही बहाल करून टाकलीय. याच टायगरनं एखाद्या प्राणी संग्रहालयातल्या एखाद्या वाघाला दत्तक घेतलं तर नक्कीच त्याचा आम्हाला खूप फायदा होईल आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळू शकेल. यासाठी आम्ही दोन दिवसांपूर्वी सलमानला याविषयी एक पत्रही पाठवलंय. त्याच्या उत्तराची आम्ही वाट पाहतोय’ असं रेणू सिंह यांनी म्हटलंय.
यापूर्वी अभिनेत्री दिया मिर्झा हिनं २०१० साली एका बिबट्याच्या बछड्याला दत्तक घेतलंय. आता एक टायगर दुसऱ्या टायगरला दत्तक कधी घेतोय, याची प्राणीप्रेमी आतुरतेनं वाट पाहतायत.