www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आयपीएल सीझन सातच्या सर्व मॅचेस भारताबाहेर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुका आणि आयपीएलचं वेळापत्रक एकाच कालावधीत असल्याने, आयपीएल मॅचेसना सुरक्षा पुरवणं अशक्य असल्याचं मत गृहमंत्री सुशील कुमार शिंदेंनी व्यक्त केलंय. तसंच यंदा आयपीएल स्पर्धा भारताबाहेर खेळवा अशी सुचनाही गृहमंत्र्यांनी केली आहे.
गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर आयपीएल कमिश्नर रणजीब बिस्वाल यांनीही भारताबाहेरील पर्यायाचा आयपीएल टूर्नामेंटकरता विचार करत असल्याचं म्हटलंय. यात दक्षिण आफ्रिकेचाही पर्याय उपलब्ध आहे. याआधी २००९ मध्ये आयपीएल टूर्नामेंट लोकसभा निवडणुकांमुळे दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, गृह मंत्रालयानं याबाबत बीसीसीआयलाही सूचित केलंय. आगामी लोकसभा निवडणुकीनंतरच आयपीएलला सुरक्षा देऊ शकणार असल्याचं यात म्हटलं गेलंय. लोकसभेच्या निवडणुका येत्या एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. यावेळी जवळपास १.२० लाख सुरक्षा सैनिकांशिवाय राज्य पोलीसांनाही तैनात करण्यात येईल.
या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमिअर लीगचं सातवं पर्व दक्षिण आफ्रिकेत होण्याची शक्यता येतेय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.