www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
क्रिकेटच्या फॅन्सना लवकरच खुश खबर मिळण्याची शक्यता आहे, कारण भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक वर्षानंतर पहिल्यांदा क्रिकेट मालिका रंगण्याची शक्यता आहे.
भारत आणि पाकिस्तानातील ताणतणाव आणि पाकिस्तानातील बिघडलेली परिस्थिती यामुळे भारत आणि पाकिस्तानात अनेक वर्षांपासून क्रिकेट मालिका खेळली गेलेली नाही, वर्ल्ड कपच्या निमित्ताने हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडत होते.
मात्र आता बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट मंडळाला येत्या आठ दिवसांत दोन देशांदरम्यान मालिका खेळविण्यासाठी दुजोरा देणार असल्याचे सांगितले आहे.
दुबईत सुरू असलेल्या आयसीसी बैठकीदरम्यान "पीसीबी`चे अध्यक्ष नजम सेठी यांनी विविध पदाधिकाऱ्यांसह बीसीसीआयशी चर्चा केली.
या चर्चेची माहिती देताना "पीसीबी`चा अधिकारी म्हणाला, की दोन्ही देशांनी आगामी आठ वर्षांत मालिका घेण्याबाबत सहमती दर्शविली आहे.
पण त्याचबरोबर बीसीसीआयने इतर सदस्यांसह केंद्र सरकारची परवानगी घेण्यासाठी आठवड्याचा कालावधी मागितला आहे.`` असे असले, तरी एका आठवड्यात मालिका घेण्याबाबत दुजोरा देण्यात येईल, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले. आगामी आठ वर्षांतील मालिका नियोजनाची आयसीसीलाही माहिती देण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे.
बीसीसीआय आणि पीसीबी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेअगोदर मालिका घेण्यावर विचार करत आहे; पण डिसेंबरपूर्वी मालिका होण्याची शक्यता फार कमी आहे. इतर देशांबरोबरही मालिकांसदर्भात करार करण्यात आले आहेत, अशी माहितीही त्या अधिकाऱ्याने दिली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.