www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आयपीएल-7मध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दरम्यान नुकत्याच झालेल्या मॅचमध्ये एका क्षणी अचानक वातावरण तापलं... मुंबईकडून खेळणाऱ्या किरोन पोलार्डचा 17 व्या ओव्हरला राग एव्हढा अनावर झाला की त्यानं आपल्या हातातली बॅटच मिशेल स्टार्कवर भिरकावला.
त्याचं झालं असं की, सामन्याच्या 17 व्या षटकांत मिचेल स्टार्कनं बाऊन्सर टाकला आणि स्लेजिंग केली. त्यानंतर पोलार्डनं हातानं इशारा करत स्टार्कला मागे जायला सांगितलं. मात्र पुढचा चेंडू टाकताना पोलार्डनं स्टार्कला हातानं इशारा करत त्याला थांबायला सांगितलं. आणि पोलार्ड स्टम्प सोडून बाजूला झाला. पण स्टार्कनं पोलार्डच्या इशाऱ्याला न जुमानता त्याच्या दिशेनं चेंडू टाकला. त्यावेळी स्टार्कचा वेगवान चेंडू पोलार्डला घासून गेला.
त्यामुळे पोलार्डचा पारा चढला... आणि तो स्टार्कच्या दिशेनं पुढे सरसावला. पोलार्डनं स्टार्कच्या दिशेनं आपल्या हातातली बॅट फिरवली. परंतु, यावेळी त्याच्या हातातून बॅट सटकली आणि जोरात जमिनीवर आदळली. सुदैवानं स्टार्कला काहीही दुखापत झाली नाही.
नाराज झालेल्या पोलार्डनं यानंतर पंचांकडे स्टार्कची तक्रार केली. याआधी टाकलेला बॉलही स्टार्कनं बाऊन्सर टाकला होता. हा बॉल पोलार्डच्या डोक्यावरून निघून गेला होता. यावेळी, स्टार्क-पोलार्डमध्ये शाब्दिक चकमकही उडाली. परंतु, पोलार्डला सोबत करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलनं यावेळी मध्यस्थी करून स्टार्कला परत जाण्याची सूचना केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.