www.24taas.com, वृत्तसंस्था, फातुल्ला
श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या वन डे सामन्यात पाकिस्तानचा पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.
लाहिरू तिरिमाने (१०२) याच्या दमदार शतकानंतर लसिथ मलिंगाने (५-५२) केलेल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर श्रीलंकेने आशिया चषक स्पध्रेच्या पहिल्याच लढतीत पाकिस्तानचा १२ धावांची पराभव केला.
मलिंगाने सर्वाधिक पाच विकेट्स घेत विजयात महत्त्वाची भूमिका निभावली. श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेल्या २९६ धावांचा पाठलाग करताना पाक संघाची दाणादाण उडाली. त्यांचे ४ फलंदाज १२१ धावांत माघारी परतल्यानंतर मिसबाह उल हक आणि उमर अकमल यांनी पाचव्या विकेट्ससाठी १२१ धावांची भागीदारी करून संघाला सावरले. संघ विजयी पथावर असताना सुरंगा लकमल याने उमरला माघारी धाडले.
विजयासाठी धावांचा पाठलाग करणारा पाकिस्तानचा संघ २८४ धावांतच गारद झाला. पाककडून मिसबाह ऊल हक आणि उमर अकमल यांनी अर्धशतकी खेळी केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय लंकन कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने घेतला. सलामीवीर तिरिमाने याने कारकिर्दीतील दुसरे शतक ठोकल्यामुळे लंकेने सहा गड्यांच्या मोबदल्यात २९६ पर्यंत मजल गाठली.
कुमार संगकारा आणि कर्णधार अँजेलो मॅथ्यूज यांनीही अर्धशतकी खेळी करत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. श्रीलंकेने ३५ षटकांत दोन बाद २०४ अशी भक्कम मजल मारली. तिरिमाने याने १०२ चेंडू टोलवून ११ चौकार व एका षटकारासह १०२ धावा केल्या. कुमार संगकारासोबत (६७) त्याने दुसर्या गड्यासाठी १६१ धावांची भागीदारी केली. पाकने यानंतर मधल्या षटकांत लंकेच्या फलंदाजीला खीळ घातली. मॅथ्यूजच्या नाबाद ५५ धावांनंतरही लंकेला ३००चा पल्ला गाठता आला नाही. पाककडून शाहीद आफ्रिदी आणि उमर गूल यांनी प्रत्येकी दोन, तर सईद अजमलने एक गडी बाद केला. लंकेने १ बाद २८ वरून पहिल्या २०षटकांत १००आणि नंतरच्या दहा षटकांत ६८ धावा काढल्या.
उमरने ७२ चेंडूंत ३ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ७४ धावा केल्या. त्यानंतर मिसबाहने एकाकी लढत सुरूच ठेवली. परंतु मलिंगाने टाकलेल्या ४५व्या षटकात सामना लंकेच्या बाजूने झुकला. मलिंगाने शाहीद आफ्रिदी आणि मिसबाह या महत्त्वाच्या खेळाडूंना माघारी धाडून लंकेचा विजय निश्चित केला. मिसबाहने ८४ चेंडूत २ षटकार व ४ चौकारांसह ७३ धावांची खेळी केली.