www.24taas.com, कोलकाता
कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खान यानं आयपीएलच्या मागच्या सीझनमध्ये वानखेडेवर केलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांशी केलेल्या गैरवर्तवणुकीचा पश्चाताप होत असल्याचं म्हटलंय. या गैरवर्तवणुकीवर शिक्षा म्हणून एमसीएनं त्याच्यावर वानखेडेवर पाच वर्षांची प्रवेशबंदी केली गेलीय.
‘मला वाटतं की मी त्यावेळी असं वागायला नको होतं. पण, त्याबद्दल आता मी आता विचार करत नाही’ असं शाहरुखनं म्हटलंय. यावेळी सात मे रोजी वानखेडेवरच केकेआरची टीम मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे. मग, शाहरुख या मॅचला उपस्थित राहणार नाही? हा प्रश्न जेव्हा शाहरुखलाच विचारण्यात आला तेव्हा शाहरुख म्हणतो, ‘मला कुणी चुकीचं समजावं हे मला आता नकोय. पण, जर मी स्टेडियममध्ये प्रवेश केलाच तर ते काय करतील? मला गोळी मारतील?’
आपल्या गमतीदार अंदाजात शाहरुख म्हणतो, ‘अधिकाऱ्यांना गंडवायचं असेलच तर मी तिथं मुखवटाही घालून जाऊ शकतो. नकली मिशांबरोबर मुखवटा घातला तर त्यांना ओळख पटवणं जरा कठिणच जाईल. पण, यंदा मला कोणताही तणाव नकोय. म्हणून मी मॅच संपेपर्यंत वानखेडेच्या बाहेर वाट बघेन आणि माझ्या खेळाडूंचा उत्साह वाढवेन’.
‘जेव्हापर्यंत माझ्या टीमला वानखेडेवर जाण्याची परवानगी आहे तेव्हापर्यंत सगळं काही ठिक आहे. मॅच आम्हीच जिंकणार. मला मॅच जिंकण्यासाठी वानखेडेवर उपस्थित राहण्याची काहीही गरज नाही’ असं म्हणत शाहरुखनं आपण ही मॅच लाईव्ह पाहण्यासाठी धडपड करणार नसल्याचंच सांगितलंय.