www.24taas.com, नवी दिल्ली
टीम इंडियाचा मिडल ऑर्डर बॅट्समन व्हीव्हीएस लक्ष्मण टेस्ट क्रिकेटला अलविदा करण्याची शक्यता आहे. हैदराबाद टेस्टनंतर लक्ष्मण टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारतासाठी सातत्याने खेळताना युवा खेळाडूंचा मार्ग रोखून धरल्याच्या टीकेमुळे निराश झालेला लक्ष्मण आता क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा गहन विचार करीत आहे. येत्या २३ ऑगस्टपासून भारत व न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला प्रारंभ होत आहे. या मालिकेनंतर लक्ष्मण आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याच्या चर्चेला चांगलाच ऊत आला आहे.
२० नोव्हेंबर १९९६ ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यातून लक्ष्मणने आपल्या कसोटी कारकीर्दीला सुरुवात केली होती. लक्ष्मणनं १३४ टेस्टमध्ये ५६ हाफ सेंच्युरी आणि १७ सेंच्युरीज झळकावल्या आहेत. गेल्या काही मॅचेसमध्ये लक्ष्मणची कामगिरी समाधानकारक झाली नव्हती. त्यामुळे त्यानं टेस्टमधू निवृत्ती घ्यावी अशी त्याच्यावर टीका होत होती. यामुळे लक्ष्मण काहीसा दुखवला होता. यामुळेच त्यानं वयाच्या ३७ व्या वर्षीची निवृत्ती घेण्याचा विचार केलाय, अशी चर्चा आहे. मात्र, लक्ष्मणने स्वत: याबाबत अधिकृत कोणतीही घोषणा केलेली नसून शनिवार किंवा रविवारी तो याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे. बीसीसीआय किंवा हैदराबाद क्रिकेट असोसिएशनकडूनही अधिकृतपणे कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. लक्ष्मण रिटायर झाला तर त्याची कमी टीम इंडियाला प्रकर्षानं जाणवणार आहे, हे नक्की.