क्रिकेटचा `देव` का कोपला?

सचिनच्या फॉर्मची चर्चा सध्या रंगत आहे. मात्र यापूर्वी सचिननं अशा चर्चेला आपल्या धावांनी उत्तर दिलं होतं. मैदानावरही त्याची एकाग्रता तो ढळू देत नसे. बेंगळुरु कसोटीत मात्र बाद झाल्यावर सचिन काहीसा रागावलेला दिसला. अनेकजण आता सचिनच्या रागाचं कारण शोधू पहात आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 4, 2012, 08:08 AM IST

www.24taas.com, बंगळुरू
सचिनच्या फॉर्मची चर्चा सध्या रंगत आहे. मात्र यापूर्वी सचिननं अशा चर्चेला आपल्या धावांनी उत्तर दिलं होतं. मैदानावरही त्याची एकाग्रता तो ढळू देत नसे. बेंगळुरु कसोटीत मात्र बाद झाल्यावर सचिन काहीसा रागावलेला दिसला. अनेकजण आता सचिनच्या रागाचं कारण शोधू पहात आहेत.
अंपायरनं चुकीचा निर्णय दिला असला तरी खाली मान घालून पँव्हेलियनकडे परतणारा सचिन आपल्याला परिचित आहे. मात्र बेंगळुरु कसोटीत सचिन क्लिन बोल्ड झाला आणि त्याची रिऍक्शन चर्चेला निमित्त झाली. 23 वर्षांच्या कारकिर्दीत सचिननं कधीहा अशी आक्रमक रिऍक्शन दिली नाही. मग आत्ताच का ?
सचिनच्या रागाची अनेक कारणं पुढे येत आहेत. बेंगळुरु कसोटीत पहिल्या इनिंगमध्ये सचिन बाद झाल्यावर सुनिल गावसकर यांनी मास्टरब्लास्टरच्या वाढत्या वयावर बोट ठेवलं होतं. कॉमेंट्रेटर संजय मांजरेकरनेही सचिनच्या फॉर्मवर टिप्पणी केली होती. यामुळेच लागोपाठ क्लीन बोल्ड झाल्यावर सचिन रागावर संयम ठेवू शकला नाही, अशी चर्चा होते आहे. आपल्या बॅटने स्टंपवर वार करता करता सावरलेला सचिन आपल्या खराब फॉर्मबद्दल इतका नर्व्हस झाला का ? असा सवाल उपस्थित होतोय.
खरंतर तेंडुलकर आणि गावस्कर यांचं अनोख नातं आहे. दोघेही एकमेकांचा खूप आदर करतात. 2010 मध्ये द. आफ्रिकाविरुद्ध सचिनने डबल सेंचुरी झळकावल्यावर गावस्कर यांनी सचिनच्या पायाला स्पर्श करण्याची इच्छा व्यक्त केली होती. सचिनही गावस्कर यांचा सल्ला नेहमी घेतो. त्यामुळेच पहिल्या डावात बाद झाल्यावर गावस्करांनी केलेलं वक्तव्य सचिनच्या मनाला लागलं असावं. त्यामुळेच दुस-या डावात चांगली खेळी करण्यासाठी आलेला सचिन बाद झाल्यावर मात्र आपला राग लपवू शकला नाही, असं बोललं जातंय. हाच अँग्री यंग मँन यापुढे आपल्यावरी कॉमेंटसना मैदानात कसं उत्तर देतो याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय.