मुंबई : विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात बीएमएम विभागातर्फे नवीन संकल्पना घेऊन यंदाही माध्यम महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
यंदाच्या माध्यम महोत्सवात वाचकांना पर्वणी ठरणारा 'पुस्तक महोत्सव' भरवण्यात येणार आहे. हा पुस्तक महोत्सव दिनांक 15, 16 आणि 17 डिसेंबर आयोजित करण्यात आला आहे.
गेल्या चार वर्षापासून बीएमएम विभागातर्फे 'चित्रशताब्दी', 'माध्यमांची जत्रा', 'बायोस्कोप', 'माध्यमगड' अशा नवनवीन संकल्पना यशस्वीरित्या गाजल्या आहेत.
महोत्सवानिमित्त दरवर्षी मराठीतील प्रसिध्द कलाकार भेट देण्यास येतात. तसेच, अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे, स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षी ही पुस्तक महोत्सवाच्या निमित्त देशातील आघाडीच्या प्रकाशकांना आमंत्रित करण्यात येणार आहे. देशभरातील विविध भाषांतील साहित्य वाचकांस पाहायला मिळणार आहे तसेच विक्रीसाठीही हे उपलब्ध असेल. पुस्तक उत्सवात चर्चासत्रे तसेच अनेकविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचाही आनंद विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.
उत्सवानिमित्त मुंबई, मुंबई उपनगरातील तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व बीएमएम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. साठ्ये महाविद्यालयाच्या मागील माध्यम महोत्सवांस मिळालेल्या उदंड प्रतिसाद पाहून यंदाच्याही माध्यम महोत्सवास विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळेवल, असा विश्वास बीएमएम विभागप्रमुख गजेंद्र देवडा यांनी व्यक्त केलाय.