पुस्तक समोर ठेवा आणि द्या परीक्षा...

पुस्तकांत सामाविष्ट करण्यात आलेले धडे समजावून न घेता केवळ घोकंपट्टी करणाऱ्या मुलांना कदाचित यापुढे अशी घोकंपट्टी करण्याची गरजच उरणार नाही, असं दिसतंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 14, 2013, 01:46 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
पुस्तकांत सामाविष्ट करण्यात आलेले धडे समजावून न घेता केवळ घोकंपट्टी करणाऱ्या मुलांना कदाचित यापुढे अशी घोकंपट्टी करण्याची गरजच उरणार नाही, असं दिसतंय. कारण, मुलांच्या अशा शिक्षणपद्धतीला छेद देण्यासाठी सीबीएसईच्या परीक्षेत ‘ओपन बुक’ पद्धती सुरू करण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे.
घोकंपट्टी केलेल्या विद्यार्थ्यांना ऐन परिक्षेच्या वेळी नेमकी गोष्ट आठवली नाही तर त्यांना मानसिक तणावाला सामोरं जावं लागतं. यावर उपाय म्हणून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) २०१४ मध्ये होणार्याे नववी व दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांसाठी ‘ओपन बुक’ परीक्षा पद्धत सुचविली आहे.
लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरादाखल मनुष्यबळ विकास राज्यमंत्री शशी थरूर यांनी सांगितले की, ही पद्धत एकत्रित मूल्यांकन दोन प्रणालीत वापरली जाणार असून, यात विद्यार्थ्यांना आधी दिलेल्या अभ्यासावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत.

अकरावी आणि बारावीसाठी ओपन केस स्टडीची पद्धत अवलंबिली जाईल. त्यासाठी केस स्टडीवर आधारलेला एक विभाग प्रश्नपत्रिकेत समाविष्ट केला जाईल. त्यासाठी उपयुक्त ठरणारी पुस्तके पूर्वतयारीसाठी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत.