www.24taas.com, मुंबई
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी आणि करियरच्या दृष्टीने महत्त्वाची समजली जाणारी दहावीची परीक्षा आजपासून सुरू होतेय.
मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, लातूर, अमरावती, कोल्हापूर, नागपूर आणि कोकण या विभागीय मंडळांतून १७ लाख ४० हजार २९० विद्यार्थी परीक्षेला बसलेत. मुंबईतून ३ लाख ८१ हजार ७२८ विद्यार्थी दहावीची परीक्षा देतायत. मुंबईत एकूण ७४१ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. नियमित विद्यार्थ्यांची जुन्या अभ्यासक्रमानुसार होणारी ही अखेरची परीक्षा असेल. पुढील वर्षीपासून दहावीचा अभ्यासक्रम बदलणार आहे.
दहावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनही सज्ज झालंय. सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षा केंद्रांवर ठिकठिकाणी व्हिडीओ कॅमेरे लावण्यात आलेत. २४५ भरारी पथकांची स्थापना करण्यात आलीय तसंच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्यात.